911 बिलियन डॉलरचा फोटो! डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला आले होते 'धनकुबेर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:59 IST2025-01-21T13:52:21+5:302025-01-21T13:59:57+5:30

Donald Trump Latest news: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींनी हजेरी लावली. हे सगळे एकत्र आल्याने ९११ बिलियन डॉलर संपत्ती एका फोटोत कैद झाली.

अमेरिकेत कडाक्याची थंडी पडलेली असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ४७वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. थंडी असली, तरी व्यासपीठावर गरमी जाणवणं साहजिक होतं, कारण जगातील सर्वात श्रीमंत माणस यावेळी उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्याला उपस्थितीत असलेल्या उद्योगपतींचा एक फोटो व्हायरल होत आहे. या सगळ्यांच्या संपत्तीची लोक बेरीज करताहेत. १२ पेक्षा अधिक धनकुबेर या सोहळ्यात होते, ज्यांच्या संपत्ती बेरीज केली, तर स्वित्झर्लंडच्या जीडीपी इतकी होते. म्हणजेच जवळपास १ ट्रिलियन डॉलर!

यातील पहिले धनकुबेर आहेत, एलन मस्क! जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. टेस्ला आणि स्पेएक्सचे सीईओ असलेले एलन मस्क ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. ते ट्रम्प प्रशासनाचाही एक भाग आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारात २५० मिलियन डॉलरपेक्षा जास्त पैसे खर्च केले. त्यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं, तर ती ५०० बिलियन डॉलरच्या जवळपास आहे.

या धनकुबेरांमध्ये दुसरे होते सुंदर पिचाई! गुगलचे सीईओ सुंदर पिचाई ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. सुंदर पिचाईंच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं, तर मे २०२४ मध्ये ती १ अरब डॉलर इतकी होती.

तिसरे धनकुबेर जेफ बेजोस! शपथविधी सोहळ्याला जेफ बेजोस हे पत्नी लॉरेन सांचेज यांच्यासोबत हजर होते. इतकंच नाही, तर त्यांची कंपनी अमेझॉनने ट्रम्प यांचा शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण प्राईम व्हिडीओवरून केले. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार बेजोस यांची नेटवर्थ नोव्हेंबर २०२४ मध्ये २२२ बिलियन डॉलर इतकी होती.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हेही ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार बनले. झुकरबर्ग पत्नी प्रिसीला चान यांच्यासोबत आले होते. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मेटाने अनेक धोरणे बदलली आहेत. यात फॅक्ट चेकिंग बंद करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. झुकरबर्ग यांची संपत्ती ऑक्टोबर २०२४ मध्ये २११ बिलियन डॉलर इतकी होती.

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्या या श्रीमंताशिवाय टिकटॉकचे सीईओ शौ जी च्यू, भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी आणि कॅसिनो अरबपती मिरियम एडलसन यांच्यासह इतरही श्रीमंत व्यक्ती हजर होत्या.