व्हेनिसमध्ये समुद्राखाली सापडला रोमन साम्राज्यातील २ हजार वर्ष जुना रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 06:35 PM2021-07-23T18:35:50+5:302021-07-23T18:39:56+5:30

व्हेनिस लगूनच्या खाली सापडलेल्या या रस्त्याबाबत पुरातत्व वैज्ञानिकांनीही दुजोरा दिला आहे. इतकंच नाही तर त्यांचा नकाशाही जारी केलाय.

पाण्यावर तरंगत्या व्हेनिसच्या उत्तर भागात समुद्राखाली रोमन साम्राज्यात तयार करण्यात आलेला एक रस्ता सापडला आहे. असं मानलं जातं की, त्यावेळी व्हेनिसचा संपूर्ण भाग कोरडा होता. आज हाच भाग समुद्राच्या पाण्यात बुडाला आहे. व्हेनिस लगूनच्या खाली सापडलेल्या या रस्त्याबाबत पुरातत्व वैज्ञानिकांनीही दुजोरा दिला आहे. इतकंच नाही तर त्यांचा नकाशाही जारी केलाय.

मुळात हा रस्ता १९८० मध्येच शोधण्यात आला होता. पण त्याचा पुरावा मिळवण्यासाठी बराच वेळ निघून गेला. रोमान साम्राज्यावेळी तयार करण्यात आलेला हा रस्ता व्हेनिसच्या बाहेरील लगूनच्या उत्तर भागातील ट्रीपोर्टी चॅनलमध्ये आहे. हा रस्ता व्हेनिस तयार होण्याच्याही आधी तयार केला होता. तेव्हा व्हेनिसबाबत कुणाला माहितही नव्हतं.

व्हेनिस येथील इन्स्टिट्यूट ऑफ मरीन सायन्सच्या जिओफिजिसिस्ट फ्रॅंटिना मद्रीकार्डो म्हणाल्या की, हा भाग पूर्वी कोरडा होता. व्हेनिस शहराबाबत कुणाला काही माहीतही नव्हतं. त्यावेळी हा मुख्य रस्ता होता. ज्याला अनेक गल्ल्या आणि उपरस्ते आहेत.

फॅंटिना मद्रीकार्डोने सांगितलं की व्हेनिस लगूनचं निर्माण पूर्वी समुद्र जलस्तर वाढल्यानं झालं. समुद्री जलस्तर ग्लेशिअरच्या वितळल्याने वाढला असेल. रोमान साम्राज्य साधारण २ हजार वर्ष जुनं आहे. तेव्हापासून आतापर्यंत अडीच मीटर म्हणजे ८ फूट वर पाणी वर आलं आहे.

फॅंटिना म्हणाल्या की, समुद्राची पाणी पातळी वाढल्याने कधीकाळी पूर्णपणे कोरडा असलेला भाग आज पाण्याखाली आलाय. इथे बघायला मिळतं की, एक रस्ता जात आहे. व्हेनिस शहराला अनेक वर्ष जुनं मानलं जात आहे. पण रोमन साम्राज्याच्या कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे पुरातत्ववाद्यांचं मत आहे की, इथे आधी अनेक गाव होते, जे नंतर विकसित होऊन शहर बनले.

याआधीही रोमन साम्राज्याच्या कलाकृती आणि प्राचीन वस्तू समुद्रा मार्गावर आणि द्वीपांवर मिळाल्या आहेत. पण तरीही कोणत्याही मानवी वस्तीचा उल्लेख किंवा संकेत दिसला नाही. ज्यावरून हे स्पष्ट होईल की त्यावेळीही व्हेनिस होतं.