प्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 05:44 PM 2018-05-25T17:44:00+5:30 2018-05-25T17:44:00+5:30
नुकत्याच झालेल्या शाही विवाह सोहळ्याचा तामझाम अजूनही आपण कुणीच विसरलो नाही आहोत. मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरीच्या विवाहाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून होतं. असं सगळं असलं तरीही लग्नानंतर मेगनचं आयुष्य फार सोपं असणार नाहीये. कारण प्रिन्स हॅरीशी लग्न केल्यानंतर तिच्यासाठी सामान्य आणि रोजच्या आयुष्यातल्या नियमित असणाऱ्या गोष्टी तिला आता बदलाव्या लागणार आहेत. कारण एका राजघराण्यातील व्यक्ती म्हणून त्या गोष्टी करणं आता नियमात बसणारं नसेल.
१) सोशल मीडिया : खूप आधीपासून मेगन एक अभिनेत्री म्हणून सोशल मीडियावरील एक प्रभावी व्यक्ती होती. भटकंती आणि खाण्याची आवड असल्याने ती सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या पोस्ट अपलोड करायची. त्यात तिला फार मोठा फॅन फॉलोईंगही होता. इतकंच नव्हे तर ‘द टिग’ नावाची तिची स्वत:ची वेबसाईटही होती. मात्र, प्रिन्स हॅरीशी लग्न ठरल्यानंतर तिने इन्स्टाग्रामसह सर्व अकाऊंट बंद केले आणि आपली वेबसाईटही बंद केली. कारण एका राजघराण्यातील सदस्य म्हणून स्वत:चं वैयक्तिक अकाऊंट ठेवण्याची परवानगी तुम्हाला नसते. त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर्स ही सर्व अकाऊंट सांभाळतात. कदाचित पुढच्या काही वर्षात राजघराण्यातील एखादा सदस्य या जुनाट निर्बंधांना कंटाळून आपले स्वत:चे अकाउंट काढू शकेल.
२) ऑटोग्राफ : मेगनने एक अभिनेत्री म्हणून आतापर्यंत आपल्या चाहत्यांना अगणितवेळा ऑटोग्राफ दिले असतील. पण लग्नानंतर ती असं करू शकत नाही. कारण राजघराण्यातील व्यक्ती म्हणून तुम्हाला ऑटोग्राफ देण्याची परवानगी नसते. कारण कदाचित त्याचा कुठेतरी गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे आता मेगनच्या चाहत्यांना पुन्हा कधीच तिचा ऑटोग्राफ मिळू शकत नाही.
३) राजकारण : मेगन पूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राजकीय घडामोडींविषयी विधानं करायची. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाची निवडणूक तसंच हिलरी क्लिंटन, ब्रेक्झिट यांविषयी ती कायम आपल्या चाहत्यांशी चर्चा करायची. पण आता तिला असं करता येणार नाहीये. कारण राजघराण्यातील व्यक्ती सार्वजनिकरित्या अशी राजकीय वक्तव्य करू शकत नाही, त्यांना तशी परवानगी नसते.
४) करिअर : खरंतर सध्या ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर होती, दरम्यान ती प्रिन्स हॅरीला डेट करू लागली आणि तिच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या. आता लग्नानंतर ती हे करिअर सोडणार की तसंच सुरु ठेवणार असा सर्वांना प्रश्न पडला होता. कारण खरंतर राजघराण्यातील व्यक्तींचे व्यस्त वेळापत्रक पाहता या शाही कुटूंबाचा कोणताही सदस्य अशा नोकऱ्या अथवा व्यवसायांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तिचा दीर अर्थात प्रिन्स विल्यम्सने लहानपणापासूनची आवड म्हणून पूर्वी पूर्णवेळ वैमानिकाची नोकरी केली होती. पण नंतर अपुऱ्या वेळेमुळे त्याला ती नोकरी सोडावी लागली. तसंच आता मेगनलाही आपलं अभिनयातील करिअर इथेच थांबवावं लागणार असं दिसतंय.
५) पर्यटन : हे तर सर्वांनाच माहित्येय की मेगनला पर्यटनाची फार आवड आहे. तिचं सोशल मीडिया अकाऊंट पाहीलं तरी याची तुम्हाला ते कळेल. पण आता तिच्या पर्यटनावर काहीशी बंधनं येणार आहेत. तिला वाटेल तिथे, वाटेल तेव्हा आणि हवं तसं फिरणं आता शक्य होणार नाही. कारण ब्रिटनच्या राजघराण्यातील कोणत्याही सदस्याला पर्यटनासाठी जायचं असल्यास सुरक्षेच्यादृष्टीने त्याची ६ महिने आधी तयारी करावी लागते. त्याठिकाणापासून प्रत्येक लहान लहान गोष्टीची सुरक्षा नीट तपासली जाते. कामानिमित्त एखाद्या ठिकाणी गेल्यास तिथे थोडा वेळ फिरता येईल असा विचार ते करू शकत नाहीत. त्यांना तिथे अर्ध्या तासापेक्षा जास्त फिरता येत नाही, थांबता येत नाही.
एका राजघराण्यातील सून असल्याने पुलच्या बाजूला बसून ड्रिंक घेणंही आता मेगनला शोभेसं नाही. जरी पर्यटनात एखादं ड्रिंक घ्यायचं असेल तर ते त्यांच्या बॉडीगार्ड्सना प्रवास सुरू करण्याआधी घेऊन जावं लागतं. कोणत्याही दुकानातून ड्रिंक विकत घेतलं आणि ते प्यायलो असं करता येत नाही. तसंच पर्यटनातही त्यांचे सुरक्षारक्षक सतत सगळीकडे कायम त्यांच्यासोबत असतात. ते त्यांना कुठेही वेगळं जाऊ देत नाहीत.
६) डिनर आणि पार्टी : मेगनने आतापर्यंत अनेक प्रकारच्या असंख्य पार्टींना हजेऱी लावली असेल. पण लग्नानंतर तिला जेवणाबाबत नविन नियमांना सामोरं जावं लागणार आहे. पूर्वी ती तिला हवं तसं, हवं तिथे जेवत असेल, मात्र यापुढे गोष्टी बदलल्या असतील. राजघराण्यात राणीचं जेवून झाल्यानंतर इतरांनाही आपलं जेवण थांबवावं लागतं. तिच्यानंतर तुम्ही जेवण सुरू ठेवू शकत नाही. तिचं जेवूण झालं की डिनर टेबल साफ केला जातो, इतरांचं जेवण होण्याची वाट पाहिली जात नाही. तसंच डिनरला कुणी कुठे बसायचं हे सुद्धा नियमांनुसार होतं. तिला वाटेल त्या टेबलच्या हव्या त्या खुर्चीवर बसून ती आता जेवू शकत नाही.
७) वेशभूषा : राजघराण्यातील स्त्रियांना कायम एक औपचारीक वेशभूषा करावी लागते. त्यांना फॅन्सी कपडे किंवा मोकळे, हवेवर उडणारे केस या सगळ्या गोष्टींना परवानगी नसते. त्यामुळे आता मेगनलाही कायम आपले केस हॅटने झाकावे लागणार आहेत. घर राजवाड्यातच एखादा कार्यक्रम होणार असेल तर या स्त्रिया ती हॅट संध्याकाळी ६ नंतर काढून ठेवू शकतात. मात्र त्यानंतर विवाहित स्त्रिया डोक्यावर टियारा किंवा मुकूट घालू शकतात.
८) ख्रिसमस : मोठ्या सुट्ट्यांमध्ये किंवा ख्रिसमसमध्ये या राजघराण्यातील सदस्यांनी काय करावं याविषयीचे वेगळे नियम आहेत. इतर कुटूंब यादिवशी भेटवस्तूंची देवाण-घेवाण करतं. मात्र या शाही कूटूंबाला ही देवाणघेवाण आदल्या दिवशीच करावी लागते. कारण ख्रिसमसचा पूर्ण दिवस अनेक कामांमध्ये व्यस्त असतो. सकाळी ते पवित्र मिस्साला जावून येतात. नंतर या पूर्ण कुटूंबाचं दुपारी मोठं कौटुंबिक जेवण असतं. तसंच सामान्य नागरिकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देणं हेसुद्धा राणीसाठी फार महत्त्वाचं कर्तव्य असतं.