Corona Vaccine: कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा; ‘या’ देशाचा नागरिकांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 05:08 PM2021-07-10T17:08:05+5:302021-07-10T17:13:04+5:30

Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर काही पथ्ये पाळण्याची सूचना केली जात आहे. काही ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करू नये, असे सांगितले जाते.

मॉस्को: गतवर्षापासून जगात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी यावर प्रभावी ठरत असलेली लस शोधून काढली. यानंतर जगभरात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

अनेक संशोधन, अभ्यासानंतर कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय आणि पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जगभरात कोरोना लसीकरण अधिकाधिक प्रमाणावर करण्यासाठी प्रोत्साहनही दिले जात आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर काही पथ्ये पाळण्याची सूचना केली जात आहे. काही ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करू नये, असे सांगितले जाते. मात्र, एका देशाने कोरोना लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

रशियातील आरोग्य अधिकाऱ्यांनी लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस शरीर संबंधापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रशियात फक्त १३ टक्के लोकांनी करोना लस घेतली आहे.

कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी दोन लशी विकसित करणाऱ्या रशियात लसीकरण फार कमी प्रमाणात झाले आहे. कमी प्रमाणात लसीकरण होत असल्याने रशियावर टीकाही होत आहे.

शरीर संबंध ठेवल्याने मानवी शरिराची अधिक प्रमाणात ऊर्जा जाते. त्यामुळेच लस घेतल्यानंतर शरीर संबंधापासून दूर राहण्याचा सल्ला देत असल्याचे डॉ. डेनिस ग्रेफर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

फक्त शरीर संबंधच नव्हे तर अधिक श्रम करावे लागणारी कामेही टाळावीत, असे डॉ. ग्रेफर यांनी सांगितले आहे. मात्र, काही वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रेफर रूस यांचा दावा फेटाळला आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर शरीर संबंध ठेवण्यास हरकत नाही, असे काही वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रशियाने कोरोनाच्या संसर्गावर पहिल्यांदा लस विकसित केला असल्याचा दावा केला.

स्फुटनिक व्ही या लशीला गतवर्षी ऑगस्ट महिन्यात रशियाने मंजुरी दिली होती. त्यानंतर काही देशांमध्ये या लसीचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

भारतानेही आपत्कालीन वापरासाठी रशियाच्या स्फुटनिक व्ही लसीला मंजुरी दिली आहे. डॉ. रेड्डीज लॅब या लसीचे उत्पादन भारतात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read in English