त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 10:09 PM2020-06-11T22:09:42+5:302020-06-11T22:37:54+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आपले पारडे जड करण्याची संधी चालून आली असताना यामध्ये रशियाने भारताऐवजी चीनच्या बाजूने आपला कल नोंदवला आहे.

कोरोनाच्या संकटादरम्यानच भारत आणि यांच्यातील सीमाप्रश्न पेटला आहे. लडाखमध्ये तर भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आलेले आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आपले पारडे जड करण्याची संधी चालून आली असताना यामध्ये रशियाने भारताऐवजी चीनच्या बाजूने आपला कल नोंदवला आहे.

भारतात जी-७ देशांच्या गटात सामील करून घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र जुना मित्र रशियाने भारताला प्रतिकूल ठरेल अशी भूमिका घेताना हा प्रस्ताव म्हणजे चीनला एकाकी पाडण्याची रणनीती असल्याचा दावा केला आहे.

रशियाच्या फेडरेशन कौन्सिलिंग इंटरनँशनलच अफेअर कमिटीचे प्रमुख कॉन्सटँटिन कोसाचेव यांनी सांगितले की, रशिया अमेरिकेने दिलेल्या जी-७ मध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावाबाबत रशिया उत्सूक नाही. तसेच रशिया चीनला लक्ष्य करण्याच्या इराद्याने तयार केलेल्या कुठल्याही गटात सहभागी होणार नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी७ संघटनेचा विस्तार करून त्यामध्ये भारत आणि रशियाला समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता.

मात्र जी-७ मध्ये सहभागी होण्याबाबत भारत आणि रशियाची भूमिका वेगवेगळी दिसत आहे. एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर रशियाने या प्रस्तावाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे भारतीय पत्रकारांशी संवाद साधताना कोसाचेव यांनी सांगितले की, भारत, रशिया, दक्षिण कोरिया आणि अॉस्ट्रेलिया या देशांना जी-७ मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले असले तरी या देशांकडे निर्णयप्रक्रियेला प्रभावित करण्याची संधी नसेल. तसेच कँनडा आणि यूकेने रशियाला जी-७ मध्ये सामील करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात एक संयुक्त विरोधी पक्ष तयार करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. अमेरिकेची सध्याची हीच रणनीती आहे. मात्र मी कुठल्याही देशाविरोधात कुठलाही गट बनवण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे.

दरम्यान, जी-७ संघटनेचा विस्तार करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे सध्यातरी कुठलेही बहुमत नाही. तसेच ते केवळ पुढचे संमेलन आयोजित करणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या नात्याने ते कुणालाही निमंत्रित करू शकतात. मात्र हे संमेलन केवळ सात देशांचेच असेल. असाही दावा त्यांनी. केला.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यातील सीमाप्रश्न हा एक द्विपकक्षीय विवाद आहे. रशियाने अशा विवादात हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी सांगितले. मात्र काही परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही ईमानदार मध्यस्थाची भूमिका निभावू, असे त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही भारत आणि चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करतो. गेल्या काही काळापासून पाश्चात्य देश रशियाविरोधात मोहीम चालवत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत रशिया आणि चीन यांच्यातील संबंध सर्वोत्तम काळातून जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.