Russia-Ukraine Crisis: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास भारताचं टेन्शन वाढणार, समजून घ्या संपूर्ण प्रकरण By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 03:32 PM 2022-02-14T15:32:18+5:30 2022-02-14T15:38:17+5:30
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास मॉस्कोवर अतिशय कठोर निर्बंध लादणार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लादले तर भारताच्या अडचणी वाढू शकतात. कीव/मॉस्को- युक्रेनमुळे जगातील दोन महासत्ता असलेल्या अमेरिका आणि रशिया यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती बनली आहे. अमेरिकन बॉम्बर्स युरोपमध्ये गस्त घालत आहेत, तर रशियानेही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास मॉस्कोवर अतिशय कठोर निर्बंध लादणार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लादले तर त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. एवढेच नाही तर S-400 हवाई संरक्षण करारावरही संकट येऊ शकते.
सिंगापूरमध्ये राहणारे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ सी राजामोहन यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा जगातील महासत्ता लढू लागतात तेव्हा परराष्ट्र धोरण हाताळणे फार कठीण असते.
भारताबाबत सी राजामोहन म्हणाले की, रशियावर गंभीर निर्बंध लादले आणि अमेरिकेने भारताला दिलेली सूट थांबवली तर त्याचा भारत आणि रशियामधील S-400 करारावर परिणाम होईल. एवढेच नाही तर हजारो भारतीय लोकांना युक्रेनमधून बाहेर काढावे लागेल आहे.
राजामोहन पुढे म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडतील आणि महागाई शिगेला पोहोचेल. रशिया जेव्हा युक्रेनमध्ये सार्वमताची मागणी करू लागेल, तेव्हा भारतासाठी सर्वात मोठी समस्या असेल.
अशाच प्रकारच्या सार्वमताच्या जोरावर आणि 90 टक्के लोकांनी रशियात सामील होण्यास समर्थन दिल्याच्या आधारावर रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला आहे. सार्वमत तुम्हाला जातीय आणि धार्मिक एकतेच्या नावाखाली दुसर्याचा प्रदेश जोडण्याची परवानगी देते.
ते म्हणाले की, जर रशियाने असे केले तर उद्या पाकिस्तानही पीओकेमध्ये जनमत संग्रह करुन दावा करू शकतो. यापूर्वी क्रिमियामध्ये सार्वमत घेण्यात आले होते, तेव्हा काश्मीरमधील फुटीरतावादी गट असलेल्या हुर्रियत कॉन्फरन्सने त्याचे स्वागत केले होते.
रशिया मित्रराष्ट्र असल्याने भारत याबद्दल बोलत नसल्याचे राजामोहन म्हणाले. मात्र, युक्रेनमध्ये सार्वमत झाले तर भारत त्याला पाठिंबा देईल अशी शंका आहे. जर हे युद्ध झाले तर भारतावर रशिया आणि अमेरिका या दोघांचा दबाव असेल.
रशिया हा भारताचा जुना मित्र असताना, अमेरिका क्वाडच्या माध्यमातून चीनविरुद्ध भारताशी मैत्री मजबूत करत आहे. एवढेच नाही तर भारताचे आर्थिक हित हे पाश्चिमात्य देशांशी निगडीत आहे.
भारत हा छोटा देश नाही आणि तो जगातील तिसरी सर्वात मोठी शक्ती बनण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच भारतीय हितांचे रक्षण व्हावे यासाठी या मुद्द्यावर ठोस पावले उचलायला हवीत.