काही तरी वेगळं घडतंय...रशियन नौदलाचा ताफा पाकिस्तानात पोहचला; भारताला मैत्रीत दगा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:58 IST2025-03-17T18:51:37+5:302025-03-17T18:58:26+5:30

रशियन नौदलाच्या जहाजांचा ताफा पाकिस्तानच्या कराची बंदरावर पोहचला आहे. या ताफ्यात फ्रिगेट आरएफएस रेज्की, आरएफएस अल्दार त्सिडेंजापोव आणि मध्यम समुद्री टँकर आरएफएस पेचेंगा यांचा समावेश आहे. दीर्घ काळानंतर रशियन नौदलाचा ताफा पाकिस्तानात पोहचल्याची घटना घडली आहे.
याआधी रशियाचे भारताशी असलेल्या संबंधामुळे त्यांनी पाकिस्तानशी अंतर राखले होते. परंतु मागील काही वर्षात बदललेल्या राजकीय रणनीतीनंतर रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारत असल्याचे दिसून येते. त्यात पाकिस्तान रशिया यांच्या ऊर्जा व्यापाराचाही समावेश आहे.
पाकिस्तानी नौदलाच्या प्रॉपगेंडा विंग डीजीपीआरने सोशल मिडिया एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात रशियन नौदलाच्या जहाजांचा ताफा, ज्यात फ्रेगिट आरएफएस रेज्की आणि आरएफएस अल्दार त्सिंडेंजापोव समाविष्ट आहे. मध्यम समुद्री टँकर आरएफएस पेचेंगासह ते सद्भावना दौऱ्यानिमित्त कराचीला पोहचलेत. पाकिस्तानकडून रशियन युद्धनौकांचे स्वागत करण्यात आले.
कराची बंदरावर पोहचल्यानंतर रशियन युद्धनौकांचे चालक पाकिस्तानी नौदलाच्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या द्विपक्षीय जहाज भाग घेतील. त्याशिवाय रशिया आणि पाकिस्तानी नौदलाचे जहाज इंटरऑपरेबिलिटी आणि सागरी सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने संयुक्त अभ्यास करणार असल्याची माहिती पाकिस्तानी नौदलाने दिली.
२०२३ साली रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी म्हटलं होतं की, आमच्या देशाला पाकिस्तानसोबत आर्थिक भागीदारी वाढवण्याची इच्छा आहे. १९९३ च्या भारत आणि रशिया मैत्रीच्या कराराला ३० वर्ष पूर्ण झाल्यानंतर इंडिया राइट नेटवर्क आणि सेंटर फॉर ग्लोबल इंडिया इनसाईट्स नावाच्या संस्थेने एक कार्यक्रम ठेवला होता त्यात डेनिस यांनी हे विधान केले.
त्यानंतर डेनिस यांनी या विधानावर स्पष्टीकरण देत रशिया कधीही असं काही करणार नाही ज्याने भारताच्या हिताला नुकसान पोहचेल. आम्ही पाकिस्तानसोबत संबंध बनवताना भारताचं हित धोक्यात येईल असं काही करणार नाही. इस्लामाबादशी आमचा संबंध मर्यादित आहे असं डेनिस यांनी स्पष्ट केले होते.
रशिया नौदलांच्या जहाजांचा ताफा कित्येक वर्षांनी पाकिस्तानात पोहचल्यानंतर आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी सावधतेचा इशारा दिला आहे. पाकिस्तानसोबत मैत्री करून रशिया थेट भारताला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
भारत जर रशियाच्या हिताकडे दुर्लक्ष करत असेल तर आमच्याकडेही पाकिस्तानसोबत संबंध वाढवण्याचा पर्याय आहे हे रशिया भारताला दाखवून देत आहे. सध्या दोन्ही देश आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडले आहेत आणि त्यांना एकमेकांची गरज असल्याचंही विश्लेषकांनी सांगितले.
पाकिस्तानकडे नवीन बाजाराच्या उद्देशाने रशिया पाहत आहे, ज्याचा त्यांनी आजतागायत उपयोग केला नाही. तर पाकिस्तानला त्यांची ऊर्जा गरज भागवण्यासाठी रशियाची आवश्यकता आहे. त्यामुळे या दोन्ही देशातील संबंध जवळ येत चालले आहेत.
अलीकडेच अमेरिकेला आपली शस्त्रास्त्रे भारताला विकायची आहेत, यामुळे अमेरिकेच्या मंत्र्यांनी रशियासोबत भारताने शस्त्रखरेदी संपवण्याची गरज असल्याचे विधान केले. ब्रिक्समध्ये भारत हा 'I' आहे. अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची तयारी रशियाकडून सुरु आहे. त्या ब्रिक्स देशात भारतही आहे त्यावरून अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेसोबत वाढणारे भारताचे संबंध पाहता रशियाही पर्याय शोधत असल्याचं विश्लेषक सांगतात. त्यामुळे आपला जुना मित्र भारताशी दगा करणार का हा प्रश्न कायम आहे.