भारताचा पुन्हा एकदा रशियाला झटका; जपानशी 'मैत्री' जपण्यासाठी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:48 AM2022-08-30T11:48:37+5:302022-08-30T11:54:40+5:30

अलीकडेच भारतानं पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनची बाजू घेत रशियाच्या विरोधात मतदान केले होते. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे, त्यामुळे जगातील अनेक देश दोन गटात विभागले गेले. रशिया यूक्रेन युद्धामुळे जगभरात रशियाच्या विरोधात पाश्चात्य देशांनी आक्रमक पवित्रा घेत रशियावर अनेक निर्बंध लादले. परंतु भारतानं रशियाविरोधात कुठलेही पाऊल उचललं नव्हतं.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान भारत सतत मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून शांततेचे आवाहन करत होता. भारताने एकदाही दोन्ही देशांबाबत आपली भूमिका मांडली नाही. याच कारणामुळे भारताने रशियाविरोधात केलेल्या मतदानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यात आता जपानशी मैत्री सांभाळत भारतानं रशियाच्या नौदल सरावात भाग घेण्यास नकार दिला.

युक्रेन आणि तैवानमधील तणावादरम्यान रशिया आणि चीनसह इतर अनेक देश जपानच्या समुद्रात १ ते ७ सप्टेंबर काळात वोस्टोक २०२२ नावानं नौदल सराव करणार आहेत. या व्यापक सरावासाठी रशियाने भारताला निमंत्रणही दिले होते, मात्र भारतानं त्याकडे पाठ फिरवली आहे.

वास्तविक, हा नौदल सराव जपानजवळ होणार आहे, ज्यांचा सध्या रशिया आणि चीन या दोन्ही देशांसोबत तणाव आहे. आपल्या जवळचा मित्र जपानसोबतच्या संबंधांची संवेदनशीलता लक्षात घेऊन भारताने हा नौदल सराव टाळल्याचे सांगण्यात येत आहे.

रशिया आणि चीनचे नौदल ओखोत्स्क समुद्र आणि जपानच्या समुद्रात व्होस्टोक २०२२ अंतर्गत जोरदार सराव सुरू करणार आहेत. अमेरिका आणि जपानसोबतच्या तणावादरम्यान या सरावातून रशिया आणि चीन हे दोन्ही देश ताकद दाखवणार असल्याचे मानले जात आहे.

हे पाहता भारताने या सरावापासून स्वतःला दूर केले आहे. जपानने या चीन, रशियाच्या या सरावाला विरोध केला. यापूर्वी, युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने व्होस्टोक २०२२ बहुदेशीय लष्करी सरावासाठी रशियाचे आमंत्रण स्वीकारले होते.

परंतु भारताचा सहभाग स्ट्रॅटेजिक कमांड आणि स्टाफ ड्रिल्सपुरता मर्यादित असेल ज्यामध्ये रशिया, चीन, सीरिया, ताजिकिस्तान, अझरबैजान, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि लाओस सहभागी होतील. मात्र जपानच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या रशिया, चीनच्या नौदल सरावाला जपानने कडाडून विरोध केला आहे.

याठिकाणी कुरील बेट म्हणतात, ज्यावर जपान आणि रशिया दोन्ही दावा करतात. दक्षिणी कुरील बेटे जपानमधील होक्काइडो आणि रशियामधील कामचटका बेटांच्या दरम्यान आहेत. जपानने रशियाकडे त्यांचा विरोध दर्शवला आहे.

जपानच्या विरोधाला बगल देत रशिया आपला नौदल सराव सुरू ठेवणार आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, रशिया आणि चीनच्या युद्धनौका एकत्रितपणे जपानच्या समुद्रात त्यांचे सामर्थ्य दाखवून सागरी क्षेत्राचे संरक्षण करतील. भारताने रशियाच्या नौदल सरावांपासून अंतर ठेवून रशियाशी समतोल साधत लष्करी सरावात भाग घेण्याचे ठरवले आहे.

जपान हा भारताचा जवळचा मित्र आणि क्वॉडचा सदस्य आहे. जपान भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या दबावानंतरही भारताने युक्रेन युद्धावर रशियावर टीका करणं टाळलं. त्याच वेळी, तैवानवरून चीन आणि जपानमध्ये तणाव वाढला आहे. जपान चीनच्या सीमेजवळ क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे.