नव्या संकटाची नांदी? चीनच्या बाजारांत सापडले तब्बल १८ व्हायरस; जगाच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 09:02 AM2021-11-20T09:02:04+5:302021-11-20T10:56:04+5:30

चीनच्या कुख्यात बाजारांमध्ये आढळून आले १८ नवे व्हायरस; माणसांसाठी धोकादायक

चीनमुळे पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढली आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाची झोप उडवणाऱ्या चीनमध्ये आणखी १८ धोकादायक विषाणू आढळून आले आहेत. हे विषाणू पाळीव प्राणी आणि माणसांमध्ये पसरू शकतात.

कोरोनाचा विषाणू माणसांपर्यंत कसा पोहोचला, तो निसर्गनिर्मित होता की प्रयोगशाळेत त्याची निर्मिती करण्यात आली, यामागचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. वुहानच्या बाजारातून कोरोनाचा विषाणू माणसांपर्यंत पोहोचल्याचं बोललं जातं.

चीनमधील वेट मार्केट्समध्ये प्राण्यांची विक्री होते. चिनी नागरिक विविध प्रकारचे प्राणी खातात. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम वुहानमध्ये आढळून आला. त्यानंतर स्थानिक प्रशासनानं सर्वप्रथम तिथलं वेट मार्केट बंद केलं होतं. आता चीनमधील कुख्यात वेट मार्केट्स पुन्हा चर्चेत आली आहेत.

चीनमधील वेट मार्केट्समध्ये आणखी १८ धोकादायक विषाणू आढळून आले आहेत. हे विषाणू पाळीव प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये पसरू शकतात. वैज्ञानिकांनी १ हजार ७२५ जंगली प्राण्यांचं विश्लेषण केलं. हे प्राणी १६ प्रजातींमधले होते. त्यांचे नमुने देशभरातून घेण्यात आले.

चीनमध्ये सर्वसामान्यपणे शिकार होणाऱ्या, जेवण म्हणून वापर होणाऱ्या प्राण्यांचे नमुने घेऊन त्यावर संशोधन करण्यात आलं. चीन, अमेरिका, बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांचा संशोधनात सहभाग होता. यातील काही प्राण्यांच्या व्यापारावर चीन सरकारनं कोरोना महामारीला सुरुवात झाल्यानंतर बंदी आणली होती.

सस्तन प्राण्यांना संक्रमित करू शकणारे ७५ विषाणू सापडले आहेत. यापैकी ४५ विषाणू पहिल्यांदाच आढळून आल्याचं नानजिंग ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी ऑफ चायनाचे वेटनरी मेडिसिन कॉलेजशी संबंधित लेखक शुओ सु यांनी सांगितलं.

सस्तन प्राण्यांना संक्रमित करू शकणाऱ्या ४५ विषाणू पहिल्यांदाच सापडले. यातील १८ विषाणू पाळीव प्राणी आणि माणसांनादेखील संक्रमित करू शकतात. मात्र संशोधकांच्या पथकाला सीओव्ही किंवा सार्स सीओव्ही-२ सारखे विषाणू सापडलेले नाहीत.

कोरोनाचा विषाणू नेमका कसा पसरला याची माहिती चीननं अद्यापही जगाला दिलेली नाही. चीननं काही दिवसांपूर्वीच कोरोनासाठी अमेरिकेतील कोळंबीला जबाबदार धरलं. ११ नोव्हेंबर २०१९ रोजी शांघायमध्ये बोस्टन लॉबस्टरचे ५५ खोके उतरवण्यात आले. त्यांच्यामधूनच कोरोनाचा विषाणू पसरला असा दावा चीननं केला.

वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू पसरला असा संशय जगातील अनेक देशांना आहे. मात्र चीननं सातत्यानं याचा इन्कार केला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये सौदी अरेबियाकडून आयात करण्यात आलेल्या कोळंबीत कोरोना विषाणू सापडला होता, असा चिनी अधिकाऱ्यांचा दावा आहे.

Read in English