Adar Poonawala: देशाला, जगाला कोरोना लस पुरविली! सीरम इन्स्टिट्यूट 'संकटात'; अब्जावधींचे डोस नष्ट करावे लागणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 08:44 AM 2022-05-24T08:44:46+5:30 2022-05-24T08:51:20+5:30
SII CEO Adar Poonawala on Corona vaccine : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जगभरात लस बनविण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरु झाली होती. रशियाने सर्वात पहिली लस बनविली खरी परंतू त्या लसीच्या पुरेशा चाचण्याच घेतल्या नव्हत्या. यामुळे ब्रिटनच्या लसीला जास्त मागणी आली.
भारतातील करोडो लोकांना आणि जगभराची मागणी पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने सर्वस्व पणाला लावले होते. असंख्य अडचणींवर मात करत सीरमने ऑक्सफर्डची ही लस पोहोचवली. परंतू, आता हीच सीरम कंपनी मोठ्या संकटात सापडली आहे.
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) अदार पुनावाला यांनी या कोरोना लसीवर मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या कंपनीला कोरोना लसीचे कमीतकमी २० कोटी डोस नष्ट करावे लागणार आहेत. या डोसची एक्स्पायरी डेट ऑगस्ट-सप्टेंबर आहे, असे ते म्हणाले.
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संमेलन सुरु आहे. याठिकाणी जगभरातील अब्जाधीश, शक्तीशाली लोक उपस्थित आहेत. अदार पुनावाला देखील या फोरमला गेले आहेत. तिथे त्यांनी एका न्यूज चॅनलला मुलाखत दिला आहे.
आम्हाला २०० दशलक्ष कोरोना लसीचे डोस नष्ट करावे लागणार आहेत. कारण त्यांची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे. कोरोना सारख्या संकटांचा सामना जगभराने एकत्र येऊन करावा, असे पुनावाला म्हणाले.
पुढच्यावेळी अशा संकटांमध्ये नेत्यांमध्ये चर्चा करण्यापेक्षा काम करण्याचे फ्रेमवर्क तयार व्हावे. कोविशिल्डनंतर सीरमने १२ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी कोवोवॅक्सचे उत्पादन घेतले. तसेच २ ते ११ वर्षे वयाच्या मुलांसाठी देखील लसीवर संशोधन झाले असून त्याची कागदपत्रे डीसीजीआयला पाठविली आहेत, असे ते म्हणाले.
लहान मुलांनाही लस द्यावी... आता जगात सध्या एकाच वयोगट उरला आहे, ज्याला कोरोनाची लस मिळालेली नाही. या लहान मुलांनाही कोरोनाची लस देण्याची गरज आहे. गेल्या वर्षी २८ डिसेंबरला डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी कोवोवॅक्सच्या वापराला मंजुरी दिली होती. सीरमने जागतिक स्तरावर ८ कोटी डोस विकले आहेत, तर आणखी १० कोटी डोस विकले जाण्याची अपेक्षा आहे. तसेच या लसीला जूनपर्यंत यूएसएफडीएची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, असेही पुनावाला म्हणाले.
सीरमला आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोस नष्ट करावे लागणार आहेत. ते कसे करावेत, कुठे करावेत आदी प्रश्न कंपनीसमोर उभे असतील. शिवाय या डोसच्या निर्मितीसाठी आलेला खर्चही प्रचंड असणार आहे. याचे नुकसानही सीरमला सोसावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनासाठी जगाची ढाल बनलेल्या या कंपनीसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे.