धक्कादायक! पियर्सिंगच्या नादात फुग्यासारखा फुगला मुलीचा चेहरा, आठवडाभरात झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:11 PM2021-07-10T23:11:53+5:302021-07-10T23:16:23+5:30

piercings: पियर्सिंग फॅशनच्या नादात एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्राझीलमधील असून, १५ वर्षीय इजाबेला एडुआर्डा डी सुसा हिचा घरामध्येच डोळ्यांच्यावरील भुवयांमध्ये छिद्र करण्याच्या नादात मृत्यू झाला.

पियर्सिंग फॅशनच्या नादात एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्राझीलमधील असून, १५ वर्षीय इजाबेला एडुआर्डा डी सुसा हिचा घरामध्येच डोळ्यांच्यावरील भुवयांमध्ये छिद्र करण्याच्या नादात मृत्यू झाला.

द सनच्या रिपोर्टनुसार केवळ १५ वर्षांच्या इजाबेल एडुआर्डा डी सुसाला भुवयांमध्ये छिद्र केल्यानंतर जिवघेण्या संसर्गाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचा चेहरा फुग्याप्रमाणे फुगला आणि तिचा चेहरा एवढा सुजला की अखेरीस तिला प्राण गमवावे लागले.

ब्राझीलचे दक्षिण-पूर्व राज्य मिनस गेरेसमध्ये आपल्या घरी सुसा हिने एका मित्राच्या मदतीने भुवयांना छिद्र पाडले. तत्पूर्वी सूसा हिने तिच्या आईकडे अनेकदा भुवयांना छिद्र पाडण्यासाठी विनंती केली होती. मात्र तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी यासाठी नकार दिला होता.

त्यानंतर सुसा हिने तिच्या एखा मित्राच्या मदतीने भुवयांमध्ये छित्र पाडून घेतले. त्यानंतर तीन दिवसांनी तिच्यामध्ये चिंताजनक लक्षणे दिसून आली. तिच्या डोळ्यांच्या जवळच्या भागाला सूज आली. तसेच तिची चिडचिड वाढली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला चारवेळा कार्डियाक अरेस्टचा झटका आला.

सुसाच्या शरीराने डोळ्यांवर छिद्र पाडण्यासाठी वापरण्यात आलेल्या परदेशी सामानाला स्वीकारले नाही. त्यानंतर तिची प्रकृती हळुहळू बिघडत गेली. त्यानंतर तिला एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे एक आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिने अखेरचा श्वास घेतला.

तिच्या मृत्यूनंतर तिची काकी जर्सीन डिसूजा हिने सांगितले की, मी माझ्या खूप सुंदर आणि खास पुतणीला गमावले आहे. मी निवेदन करते की मुलांनी आपले आई-वडील, काका-काकी आणि आजी आजोबांचं ऐकलं पाहिजे.

दरम्यान, इजाबेलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, जर इजाबेला वाचली असती तरी कदाचित तिने भुवयांना छिद्र पाडलेल्या डोळ्याची दृष्टी गेली असती.

दरम्यान, विशेष परवाना प्राप्त क्लिनिकमध्ये तज्ज्ञ व्यक्तीकडूनच पियर्सिंगसारखी सौंदर्य प्रक्रिया करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.