इंडोनेशियात त्सुनामीने हाहाकार; मृतांचा आकडा 832 वर By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 08:30 PM 2018-10-01T20:30:10+5:30 2018-10-01T20:34:32+5:30
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला.
भूकंप व त्सुनामीच्या बसलेल्या तडाख्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 832 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने रविवारी मृतांचा नवा आकडा जाहीर केला.
हा आकडा आधीच्या मृतांच्या संख्येपेक्षा सुमारे दुपटीने अधिक असून इंडोनेशियाचे उपाध्यक्ष जुसूफ कल्ला यांनी मृतांची संख्या हजारांच्या घरात जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
सुलावेसी बेटावर असलेल्या पालू या प्रमुख शहरामध्ये रविवारी मदतीचा ओघ सुरू झाला. या ठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले असून युद्धपातळीवर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, जखमींवरील उपचारांसाठी स्थानिक रुग्णालये अपुरी ठरत असून अनेकांवर उघड्यावरच उपचार केले जात आहेत.
तसेच, भूकंप व त्सुनामीमुळे आतापर्यंत 17000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. येथील मुख्य रस्त्यांचे नुकसान झाल्यामुळे आणि ठिकठिकाणी दरड कोसळल्यामुळे मदतकार्यातही अडथळे येत आहेत.