म्हणून अझरबैजानविरुद्धच्या संघर्षात अर्मेनियाला पाठिंबा देत आहेत भारतीय By बाळकृष्ण परब | Published: October 12, 2020 05:22 PM 2020-10-12T17:22:21+5:30 2020-10-12T17:41:28+5:30
nagorno-karabakh war News : अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात झालेल्या या लढाईमध्ये भारतीयांकडून अर्मेनियाला पाठिंबा देण्यात येत आहे. मात्र भारताने अधिकृतपणे या संघर्षावर तटस्थ भूमिका कायम राखली आहे. नागोर्नो-काराबाखवरून सध्या अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात जबरदस्त संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत हजारो सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागोर्नौ-काराबाख हा भाग अझरबैजानच्या कब्जात असला तरी येथील बहुतांश जनता ही अर्मेनियाई आहे. हे अर्मेनियाई लोक ख्रिश्चन आहेत. तर अझरबैजान हा मुस्लिम बहूल देश आहे.
अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात झालेल्या या लढाईमध्ये भारतीयांकडून अर्मेनियाला पाठिंबा देण्यात येत आहे. मात्र भारताने अधिकृतपणे या संघर्षावर तटस्थ भूमिका कायम राखली आहे. तसेच दोन्ही देशांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, भारत अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चिंतीत आहे. यामुळे क्षेत्रिय शांतता आणि सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो. आम्ही दोन्ही देशांना एकमेकांविरोधातील शत्रुत्व संपुष्टात आणण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन करत आहोत. दोन्ही देशांनी सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जी पॉलिसी इंस्टिट्युटने दिलेल्या माहितीनुसार टर्किश आणि पाकिस्तानी सोशल मीडियावर अझरबैजानला पाठिंबा देत आहे. तर भारतीयांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून अर्मेनियाला पाठिंबा मिळताना दिसत आहे. भारतीय सोशल मीडियावर #IndiaSupportsArmenia ह्या हॅशटॅगवरून मोठ्या प्रमाणात ट्विट केले जात आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावादरम्यान, टर्किश अकाऊंट्सवरून पाकिस्तानला ट्विट केले जात होते. कलम ३७० हटवल्यानंतर टर्कीच्या लोकांनी #Pakistanisnotalone या हॅशटॅगवरून ट्विट केले जात होते. आता नागोर्नो काराबाखवरून एक नवा हॅशटॅग दिसून येत आहे. पाकिस्तानी आणि टर्किश अकाऊंटवरून हॅशटॅग #Azerbaijanisnotalone वरून ट्विट केले जात आहेत.
दरम्यान, एका भारतीय युझरने लिहिले आहे की, भारताचे अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. मात्र अर्मेनिया काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा देत आला आहे. तसेच अर्मेनियाचे पाकिस्तानसोबत कुटनीतिक संबंध नाहीत. जर पाकिस्तान आणि टर्की हे कुठल्या देशाविरोधात असतील तर तो देश आपल्या जागी योग्यच असला पाहिजे. त्यामुळे भारताने अर्मेनियाला पाठिंबा दिला पाहिजे.
अर्मेनियामध्ये भारताचे राजदूत राहिलेल्या अचल मल्होत्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी झालेल्या चर्चेत सांगितले की, अर्मेनिया आणि भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दृढ संबंध आहेत. भारतात अर्मेनियाई लोक आठव्या शतकापासून राहत आहेत.
अर्मेनिया-अझरबैजान संघर्षात पाकिस्तान आणि टर्कीने अझरबैजानला पाठिंबा दिल्याने भारतीयांकडून अर्मेनियाला पाठिंबा दिला जात आहे. काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानला टर्की आणि अझरबैजानकडून पाकिस्ताला पाठिंबा दिला जातो, त्यामुळे भारतीय अझरबैजानविरोधात भूमिका घेत आहेत.
यादरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तान आपला मित्र असलेल्या अझरबैजानसोबत उभा आहे आणि पाकिस्तानच्या आत्मरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा देतो. मात्र अझरबैजानला लष्करी मदत केल्याचे वृत्त पाकिस्तानने फेटाळले आहे.
भारतीयांकडून अर्मेनियाला केवळ व्हर्च्युअल पाठिंबा मिळत नाही आहे तर प्रत्यक्षातही मदत दिली जात आहे. इंडो-अर्मेनियन फ्रेंडशिप एजीओच्या माध्यमातून अर्मेनियाला मदत करण्यासाठी निधी गोळा केला जात आहे.
भारताने अधिकृतरीत्या या संघर्षात कुठल्याही देशाची बाजू घेतलेली नाही. मात्र भारताने अर्मेनियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला होता. मार्च महिन्यात भारत आणि अर्मेनियामध्ये ४० दशलक्ष डॉलरचा करार झाला होता.
मात्र भारताचे माजी राजदूत अचल मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार भारताने अर्मेनियाला पाठिंबा दिल्यास काश्मीरच्याबाबतीत भारताला कुटनीतिक नुकसान सहन करावे लागेल. मात्र काश्मीर प्रश्न हा अर्मेनिया अझरबैजानमधील विवादापेक्षा खूप वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र असे असले तरी पाकिस्तान आणि टर्की इस्लामिक देशांच्या संघटनेमध्ये त्याचा दुरुपयोग करू शकतात.
मात्र अझरबैजानच्या तुलनेत अर्मेनिया भारताच्या अधिक जवळ आहे. दोन्ही देशांमध्ये १९९२ पासून कुटनीतिक संबंध आहेत. तसेच भारताकडून राष्ट्रपती स्तरावरील तीन दौरै झाले आहेत.
भारताचे दोन उपराष्ट्रपतीसुद्धा अर्मेनियाच्या दौऱ्यावर गेले होते. दुसरीकडे भारत आणि अझरबैजानमध्ये कधीही वरीष्ठ स्तरावरील नेत्याचा कुठलाही दौरा झालेला नाही. पण कुटनीतिक दृष्टीने अर्मेनियाच्या जवळ असूनही भारत कुठल्याही एका पक्षाची बाजू घेण्याच्या स्थितीत नाही.