...म्हणून १३ हजार किमी प्रवास करून ऑस्ट्रेलियात आलेल्या कबुतराला दिला जाणार मृत्यूदंड By बाळकृष्ण परब | Published: January 14, 2021 10:42 PM 2021-01-14T22:42:07+5:30 2021-01-14T22:50:18+5:30
US pigeon in Australia : ऑस्ट्रेलियामध्ये सध्या एका कबुतरावरून मोठा गोंधळ उडाला आहे. तब्बल १३ हजार किमी प्रवास करून ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या या कबुतराला मारण्याचा विचार सुरू असून, त्यावरून मतमतांतरे व्यक्त करण्यात येत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या एका कबुतरावरून मोठा गोंधळ उडाला आहे. तब्बल १३ हजार किमी प्रवास करून ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या या कबुतराला मारण्याचा विचार सुरू असून, त्यावरून मतमतांतरे व्यक्त करण्यात येत आहेत.
हे रेसिंग कबुतर अमेरिकेमधून सुमारे १३ हजार किमी प्रवास करत ऑस्ट्रेलियात पोहोचले आहे. हे कबुतर २९ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील ओरेगन येथील एका रेसमधून बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते कबुतर २६ डिसेंबर रोजी मेलबर्नमध्ये पोहोचले होते.
त्यानंतर हे कबुतर मेलबर्नमधील सेली बर्ड यांना आपल्या घराच्या मागच्या भागात दमछाक झालेल्या अवस्थेत भेटले होते. दरम्यान, हे कबुतर सापडल्याचे वृत्त मिळाल्यापासून ऑस्ट्रेलियातील प्रशासन सावध झाले आहे.
या कबुतरामुळे ऑस्ट्रेलियात अज्ञात आजार पसरू शकतात, अशी भीती अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे पॅसिफिक महासागर पार करून ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या या पक्षाला मारण्याचा विचार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सेली यांना फोन करून या कबुतराला पकडण्याची सूचना केली आहे. जगभरात बर्ड फ्लू पसरत असल्याने सध्या ऑस्ट्रेलियातही चिंता वाढलेली आहे.
हे कबुतर कुठल्या तरी मालवाहू जहाजाच्या मतदीने पॅसिफिक महासागर पार करून ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचले असावे, अशी शंका तज्ज्ञांना आहे. दरम्यान, या कबुतराचे नाव अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांच्या नावावरून जो असे ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यापासून हे कबुतर ऑस्ट्रेलियामधील प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील कृषी विभागाने एक पत्रक जारी करून या कबुतराला देशात राहण्याची परवानगी नाही. या कबुतरामुळे देशातील जैवविविधतेवर परिणाम होईल. तसेच अन्नसुरक्षा आणि पोल्ट्री उद्योगांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
असे असले तरी या कबुतराने केलेला प्रवास हा कुठल्याही कबुतराने केलेला आतापर्यंतचा सर्वात दूरचा प्रवास ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही कबुतराने १३ हजार किमी एवढा प्रवास केला नव्हता. कबुतरपीडिया.कॉम ने दिलेल्या माहितीनुसार कबुतराने पार केलेल्या सर्वाधिक अंतराचा विक्रम १९३१ मध्ये घडला होता. तेव्हा एक कबुतर फ्रान्समधील अर्रास येथून व्हिएटनाममधील सायगाव येथे पोहोचले होते.