Sri Lanka Crisis: संकटकाळात भारताकडून मोठी मदत, श्रीलंकेच्या पंतप्रधानांकडून आभार मानत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 08:33 AM2022-05-28T08:33:05+5:302022-05-28T08:42:05+5:30

Sri Lanka Crisis: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला भारतानं २५ टन आवश्यक औषधंही पुरवली आहेत. याची किंमत २६ कोटी श्रीलंकन रुपये इतकी आहे.

Sri Lanka Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी अनेक देश मदतीसाठी पुढे येत आहेत. या देशांमध्ये सर्वाधिक योगदान देणारा देश म्हणजे भारत. भारत श्रीलंकेला औषधांसह अन्नधान्य पुरवत आहे.

दरम्यान, यानंतर श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी या कठीण काळात दिलेल्या मदतीबद्दल ट्वीट करून भारताचे आभार मानले आहेत. विक्रमसिंघे यांनी सलग दोन ट्वीट केले. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी माझे संभाषण झाले आणि या कठीण काळात भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील अशी मी आशा करतो, असं त्यांनी यात नमूद केलं आहे.

विक्रमसिंघे यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, क्वाड सदस्यांसाठी (अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया) परदेशी मदत संघटनेच्या स्थापनेमध्ये नेतृत्व करण्याच्या प्रस्तावावर भारत आणि जपानने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञ आहे.

आर्थिक संकटामुळे आवश्यक औषधांचा तुटवडा असलेल्या श्रीलंकेला भारताने २५ टन औषधे सुपूर्द केली. त्यांची किंमत जवळपास २६ कोटी श्रीलंकन ​​रुपये आहे. कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्ताने ट्वीट करून ही माहिती दिली. कार्यवाहक उच्चायुक्त विनोद के जेकब यांनी कोलंबोमध्ये श्रीलंकेचे आरोग्य मंत्री केहेलिया रामबुकावाला यांच्याकडे ही खेप सुपूर्द केली.

INS घरियाल या जहाजावर मानवतावादी मदत म्हणून श्रीलंकन ​​मच्छिमारांसाठी भारतातून रॉकेलही आणण्यात आले आहे. लवकरच लाभार्थ्यांना इतर वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात, भारताने श्रीलंकेसाठी कर्ज घेण्याची मर्यादा ५० कोटी डॉलर्सनं वाढवली. त्यांच्याकडे कच्चं तेल आयात करण्यासाठी विदेशी चलन नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.

दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली श्रीलंकेतील एकमेव रिफायनरी शुक्रवारी पुन्हा सुरू झाली आणि त्याला रशियाकडून त्यांना कच्चं तेलही मिळू लागले. सपुगस्कंदा रिफायनरी पाच दशकांहून अधिक जुनी आहे. त्याची क्षमता प्रतिदिन ५० हजार बॅरल इतकी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेला श्रीलंका हा देश या आव्हानाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

रानिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीला (UNP) श्रीलंकेच्या २२५ सदस्यांच्या संसदेत फक्त एक जागा मिळाली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष युएनपी २०२० मध्ये एकही जागा जिंकू शकला नाही.

युएनपीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोलंबोमधून निवडणूक लढवणारे विक्रमसिंघे देखील पराभूत झाले. नंतर एकत्रित राष्ट्रीय मतांच्या आधारे UNP ला दिलेल्या राष्ट्रीय यादीद्वारे तो संसदेत पोहोचू शकले.