अमेरिकेत विचित्र परिस्थिती; दीड कोटी लोकांना वीज, पाणी नाही, बर्फ उकळवायची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 05:26 PM2021-02-20T17:26:03+5:302021-02-20T17:30:46+5:30

Texas Winter Storm : गेल्या दोन तीन वर्षांपासून जगभरात चित्र-विचित्र घटना घडू लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीची विदारक दृष्ये विचलीत करत होती, तोवर जगभर कोरोनाने थैमान घालणे सुरु केले. भारत, अमेरिकेत जलप्रलयसारख्या घटना घडल्या असताना आता अमेरिकेवर आणखी एक मोठे संकट आले आहे.

गेल्या दोन तीन वर्षांपासून जगभरात चित्र-विचित्र घटना घडू लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीची विदारक दृष्ये विचलीत करत होती, तोवर जगभर कोरोनाने थैमान घालणे सुरु केले. भारत, अमेरिकेत जलप्रलयसारख्या घटना घडल्या असताना आता अमेरिकेवर आणखी एक मोठे संकट आले आहे.

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये जवळपास 1.4 कोटी लोकांना पाण्याच्या संकटाशी दोन हात करावे लागत आहेत. राज्यात 10 फेब्रुवारीला आलेल्या हिमप्रलयामुळे म्हणजेच प्रचंड हिमवर्षाव झाल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. या हिम प्रलयामुळे तेथील इलेक्ट्रीसीटी ग्रीड बंद पडले आहेत.

यामुळे करोडोवर लोकांना गेल्या 10 दिवसांपासून वीज आणि हिटरशिवाय़ जिवघेण्या थंडीमध्ये रहावे लागत आहे.

तुफान थंडी असल्याने पाण्याची पाईपलाईनमध्ये असलेले पाणीदेखील बर्फ बनले आहे. यामुळे आकार वाढून पाईपलाईन फुटल्या आहेत. यामुळे लोकांना पाण्यापासून देखील वंचित रहावे लागत आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, पाणी येत नसल्याने लोकांनी साचलेला बर्फ एकत्र करून तो गरम केला आणि त्या पाण्याने दैनंदिन कामे उरकली.

अनेकांना बाटलीबंद पाण्याचा वापर करावा लागत आहे. परंतू आता हे पाणीदेखील संपत चालले आहे. ह्युस्टनच्या स्टेडिअमबाहेर पाण्याची बॉटल घेण्यासाठी शेकडो लोकांच्या रांगा लागल्या होता.

अमेरिकेच्या टेक्सास राज्याची एकूण लोकसंख्या ही 2.9 कोटी आहे. यापैकी निम्मे लोक पाणी टंचाईच्या संकटात सापडले आहेत.

गेल्या 5 दिवसांपासून काही भागातील वीज गायब झाली आहे. आता कुठे वीज निर्मिती केंद्र सुरु होत आहेत. तरीही सुमारे दोन लाख घरांमध्ये वीज आली नव्हती.

गुरुवारी दुपारपर्यंत टेक्सासच्या एक हजार पब्लिक वॉटर सिस्टिम आणि राज्याच्या 177 काऊंटीमध्ये पाण्याची समस्या कायम होती.

वीजेचा पुरवठा सुरु झाल्याने पाण्याचा पुरवठादेखील दुरुस्ती करून सुरु होण्याची आशा या लोकांना आहे. मात्र, तोवर त्यांना बर्फ उकळवावा लागणार आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, बर्फ गरम करून त्याचे पाणी पिणे लोकांच्या आरोग्याला धोकादायक आहे. रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टीमुळे टेक्सासमध्ये 50 लोकांचा मृत्यू झाला आहे.

काही लोक बर्फवृष्टी पाहून घर सोडून सुरक्षित ठिकाणी राहण्यास गेले होते. मात्र त्यांच्या घराची छपरे तुटली आहेत. कारण कमी तापमानामुळे घरातील पाण्याचे पाईप फुटले आहेत.