रशिया अन् युक्रेनच्या सीमेवर तणाव वाढला; क्षेपणास्त्रांच्या चाचणीमुळे जगावर युद्धाचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 04:09 PM2022-02-20T16:09:01+5:302022-02-20T16:12:20+5:30

युक्रेन आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनीही रशिया येत्या आठवड्यात युक्रेनवर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली होती. रशियाकडून युक्रेनची राजधानी कीव निशाण्यावर असल्याचं समोर आलं आहे.

युक्रेन आणि रशियात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असल्याची माहिती आहे. रशियाकडून क्षेपणास्रांसोबत युद्ध अभ्यासास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळं अमेरिका, युरोपसह पश्चिमी देशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

युक्रेन बंडखोरांचीही प्रचंड दहशत आहे. त्यामुळे यूक्रेन दुहेरी अडचणीत आहे. युक्रेन सध्या दुहेरी कात्रीत अडकलाय. देशांतर्गत बंडखोरी मोडायची की सीमेवर रशियाचा सामना करायचा असा प्रश्न यूक्रेनला पडलाय. रशियाने हल्ला केला तर बंडखोरही इथे यूक्रेनमध्ये हाहाकार माजवण्याच्या तयारीत आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना यूक्रेन-रशियातील वादावर चर्चेतून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. म्युनिक सुरक्षा परिषदेतही बोरीस जॉनसन यांच्याकडून भूमिका जाहीर कऱण्यात आली आहे. यूक्रेनची सुरक्षा हिच आमची सुरक्षितता असल्याचं बोरीस जॉनसन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांनी रशियाला इशारा दिलाय. युक्रेनवर हल्ला केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं कमला हॅरीस म्हणाल्यात.

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या म्यूनिच सुरक्षा संमेलनमध्ये यूक्रेनच्या राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी पश्चिमी देशांच्या विरोधातील धोरण रशियानं सोडून द्यावं, असं म्हटलंय. तर, यूक्रेननं रशियाकडून होणाऱ्या आक्रमणावरुन चिंता व्यक्त केलीय. वोलोदिमीर जेलेंस्की म्हणाले की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना काय पाहिजे हे माहिती नाही. मी त्यांना चर्चेचा प्रस्ताव देत आहे.

रशिया चर्चेचा पर्याय निवडू शकतं. या संकटावर शांततापूर्ण समाधान काढण्यासाठी यूक्रेन केवळ वाटाघाटीच्या मार्गानं पुढं जाऊ शकतं, असं म्हटलंय. रशिया आणि यूक्रेनच्या वादामुळ जगावर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.