जपानला शून्यातून बाहेर काढणारा पंतप्रधान, अर्थव्यवस्थेसाठी 'आबेनॉमिक्स' ठरले इंजिन By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 11:08 AM 2022-07-09T11:08:16+5:30 2022-07-09T11:24:49+5:30
जपानला महागाईवृद्धी आणि उत्पादन यांच्याशी संबंधित मंदीतून म्हणजेच शून्यावस्थेतून (स्टॅगफ्लेशन) यशस्वीरीत्या बाहेर काढण्याचा पराक्रम शिंजो आबे यांच्या नावावर आहे. एका माथेफिरूच्या गोळीला बळी पडलेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी आर्थिक क्षेत्रात विशाल काम केलेले असून जपानला महागाईवृद्धी आणि उत्पादन यांच्याशी संबंधित मंदीतून म्हणजेच शून्यावस्थेतून (स्टॅगफ्लेशन) यशस्वीरीत्या बाहेर काढण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. सध्या संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था स्टॅगफ्लेशनच्या संकटात सापडलेली आहे. या पार्श्वभूमीवर आबे यांची कामगिरी किती महत्त्वाची होती, हे लक्षात येते.
शून्यावस्थेच्या काळात जपानसमोरील आव्हानांचे स्वरूप आर्थिक तर होतेच; पण सामाजिकही होते. जपानच्या लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. शिवाय मुलांच्या सांभाळाची समस्याही होतीच. आबे यांनी कामकाजाचे स्वरूप बदलले. माता-पिता आपल्या मुलांसह कार्यालयीन कामकाज सांभाळू शकतील, अशी नवी रचना त्यांनी केली.
आबेनॉमिक्सने किमया दाखवली असली, तरी आबे यांच्या कठोर उपाययोजनांमुळे जपानमधील एक मोठा वर्ग दुखावलाही गेला. अर्थव्यवस्थेत बदल दिसत असले तरी ते वरवरचे आहेत, मुख्य समस्या कायम आहे, असे या वर्गाचे म्हणणे होते. आबे यांना गोळ्या घालणारा मारेकरी याच विचारांचा होता, असे समजते.
महागाईचा दर शून्यावर आल्यानंतर जी स्थिती अर्थव्यवस्थेत निर्माण होते, त्यास शून्यावस्था (स्टॅगफ्लेशन) म्हटले जाते. ही स्थिती अर्थव्यवस्थेच्या वृद्धीला पूर्णत: संपवून टाकते. त्यामुळे अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने घसरगुंडीला लागते.
बेरोजगारी दर ४.३ टक्क्यांवरून घटून २.४ टक्क्यांवर आला. तर दुसरीकडे करांतून मिळणारा महसूल ४०२ अब्ज डॉलरवरून ५५० अब्ज डॉलरवर पोहोचला.
अर्थव्यवस्थेसाठी ‘आबेनॉमिक्स’ कसे ठरले इंजिन ? एखाद्या उत्पादनाची किंमत कमी असेल आणि उद्या ती आणखी कमी होणार आहे, हे जेव्हा ग्राहकास कळते तेव्हा तो आजची खरेदी उद्यावर ढकलतो. त्यामुळे विक्री व उत्पादन घटते.
कंपन्यांचा नफा घसरतो. या स्थितीतून बाहेर येणे महाकठीण होऊन बसते. अशा कठीण परिस्थितीच्या काळात शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेऊन अर्थव्यवस्थेला रुळावर आणले. त्यासाठी त्यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यास ‘आबेनॉमिक्स’ असे नाव पडले.
जपानचे कॅबिनेट ऑफिस नॅशनल अकाउंट आणि वित्त वर्ष २०१९ मधील इकॉनॉमिक आउटलूक रिपोर्टमधील आकडेवारीनुसार आबेनॉमिक्सच्या कामगिरीमुळे २०१२ मध्ये ४६४५ अब्ज डॉलर असलेला जपानचा नॉमिनल जीडीपी २०२० पर्यंत वाढून ५,०९६ अब्ज डॉलरवर पोहोचला. याच अवधीत उद्योगांचा करपूर्व नफा ७४८ अब्ज डॉलर इतक्या उंचीवर पोहोचला.