Coronavirus Update: चिंताजनक! 'या' देशांमध्ये अद्यापही कोरोना लस पोहोचलीच नाही; स्थिती गंभीर By देवेश फडके | Published: February 22, 2021 02:31 PM 2021-02-22T14:31:48+5:30 2021-02-22T14:36:21+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत (Coronavirus Update) चालल्याचे दिसत असून, ही बाब गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील सुमारे ८७ देशांमध्ये कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccine) सुरू झाले आहे. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये कोरोना लस पोहोचलेली नाही. कोरोना लसीचा पहिला डोसही पोहोचला नाही, अशा देशांची संख्या १३० असून, जगभरात जोपर्यंत कोरोना लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोरोना संकट आटोक्यात येऊ शकणार नाही, असे सांगितले जात आहे. वॉशिंग्टन : सन २०२० कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील संशोधनात गेले. अवघे जग ठप्प झाले असताना शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी दिवस-रात्र एक करून कोरोना लसीचा शोध लावला.
सन २०२१ हे वर्ष आशादायी मानले जात असून, अनेकविध देशांनी तसेच जागतिक आरोग्य संघटनेने काही लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. यानंतर ताज्या आकडेवारीनुसार ८७ देशांमध्ये कोरोना लसीकरणाचे काम सुरू झाले.
जागतिक स्तरावरील ८७ देशांमधील २० कोटी नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे. प्रतिदिन ६५ लाख ०२ हजार ८५३ जणांना कोरोना लस दिल्यास जगाच्या ७५ टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्यास ४.८ वर्षांचा कालावधी लागू शकेल, असा दावा करण्यात येत आहे.
ब्रिटन आणि आफ्रिकेत कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर ब्राझील, भारत, जपान, फिनलँडसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, ही बाब चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. कोरोनाचे नवीन प्रकार अधिक घातक असून, कोरोनाविरोधातील लढाई अद्याप शमलेली नाही, असेच यावरून दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.
युनायटेड नेशन्सचे महासचिव अँटिनियो गुटरेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावरील १३० पेक्षा जास्त देशांमध्ये अद्यापही कोरोना लसीचा पहिला डोस पोहोचलेला नाही. जागतिक स्तरावर मान्यता दिलेल्या कोरोना लसींच्या ७५ टक्के डोसवर केवळ १० देशांनी कब्जा केला आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
अमेरिकेत आतापर्यंत ५ कोटी ७० लाख जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. अमेरिकेनंतर चीन, युएन आणि भारताचा क्रमांक कोरोना लसीकरणाच्या यादीत लागतो, असे सांगितले जात आहे. जागतिक स्तरावरील अनेक देशांना आता गरीब आणि अद्यापही कोरोना लस न पोहोचलेल्या देशांची चिंता असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक लसींना मान्यता देऊनही गरीब देशांना अद्याप कोरोना लस मिळालेली नाही. गरीब देशांनाही कोरोना लस मिळावी, यासाठी COVAX नामक लसीला परवानगी दिली आहे. मात्र, मोठ्या देशांनी नोंदणी करून ठेवल्यामुळे गरीब देशांना पुरवठा करणे कंपन्यांना शक्य होत नसल्याचा दावा केला जात आहे.
जोपर्यंत जागतिक स्तरावरील बहुतांश देशांतील नागरिकांना कोरोना लस मिळणे आवश्यक आहे. जगातील सर्व देशांमध्ये कोरोना लस पोहोचून लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोरोनाचे संकट आटोक्यात येऊ शकत नाही. त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही, असे मत प्रो. ब्रूक बेकर यांनी व्यक्त केले आहे.
विशेष करून आफ्रिकी देशांमध्ये वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक स्तरावरील कोरोना संकटाची चिंता वाढत आहे. नवीन कोरोनाच्या प्रकाराचे १५ लाख रुग्ण आढळे आहेत. यामुळे ५० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संकटाशी जग अद्यापही लढत आहे. भारतात महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लॉकडाऊन, नाइट कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे.