निसर्गाची सहनशक्ती संपली! पृथ्वीचं फुफ्फुस जळून नष्ट होणार; माणसांवर मोठं संकट येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 09:10 PM2022-03-08T21:10:13+5:302022-03-08T21:13:24+5:30

पृथ्वीसमोर गंभीर संकट; परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं विनाश अटळ

कोविड महामारीचं संकट संपणार असं वाटत असताना युक्रेन-रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. जग नव्या संकटाचा मुकाबला करत असताना आता जगासमोर आणखी एक संकट उभं ठाकलं आहे. ऍमेझॉनमधील पर्जन्यवनांबद्दल शास्त्रज्ञांनी काळजी वाढवणारं भाकीत केलं आहे.

ऍमेझॉन पर्जन्यवन आता अशा स्थितीत पोहोचली आहेत, जिथून त्यांचं नुकसान रोखलं जाऊ शकत नाही. यापुढे ऍमेझॉनच्या जंगलांचं नुकसान होतच राहील. ते रोखणं आता माणसांच्या हाती राहिलेलं नाही. येत्या काळात ऍमेझॉनचा तीन चतुर्थांश भाग जळून खाक होईल, अशी माहिती समोर आली आहे.

अनेक दशकांमधील वातावरणाचा, पर्यावरणाचा अभ्यास करून समोर आलेल्या माहितीनुसार ऍमेझॉनची वाटचाल शेवटाकडे सुरू आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेली जंगलतोड आणि जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे परिस्थिती दिवसागणिक भीषण होत आहे.

ऍमेझॉनच्या जंगलांची सहनशक्ती संपली आहे. आता ऍमेझॉनचा प्रवास उद्ध्वस्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे. ऍमेझॉनच्या जंगलामुळे पाण्याचं बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया घडते. त्यामुळे आसपासच्या भागात पाऊस पडतो. जंगलाचा एक भाग संपल्यास त्याचा परिणाम पावसावर होईल.

लवकरच अशी वेळ येईल जेव्हा पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडेल. जंगल परिसरात आग लागेल. हे चक्र संपूर्ण जंगलाला हळूहळू संपवून टाकेल. याबद्दलची माहिती नेचर क्लायमेट चेंज जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये उपग्रहांच्या मदतीनं मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे.

ऍमेझॉनची सहनशक्ती आता संपल्याचं उपलब्ध माहितीवरून पुढे आलं आहे. एक्स्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी ऍमेझॉनच्या जंगलातील विविध भागांची सहनशक्ती तपासून पाहिली. बदलत्या वातावरणाचा सामना करताना जंगलांमधील विविध भागांना करावा लागणारा संघर्ष यातून पुढे आला आहे.

जंगलाच्या सहनशक्तीमध्ये ते प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा बचाव कसं करतं, जंगलतोड, वातावरणातील बदलांचा सामना कसं करतं अशा गोष्टींचा समावेश होतो. नैसर्गिक संकटांना तोंड देण्याची क्षमता जंगलांमध्य असते. त्यातून ते पूर, भूकंप अशा संकटांचा मुकाबला करतात.

संकटांमधून बाहेर पडण्यासाठी जंगलांना अधिक वेळ लागत असल्यास त्यांची सहनशक्ती कमी होत आहे. ही बाब पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकते. ऍमेझॉन पर्जन्यवन गेल्या २ हजार वर्षांपासून आपली सहनशक्ती गमावत आहे. जंगलातील २०० किलोमीटर भागात ही सहनशक्ती पूर्णपणे संपली आहे. हा भाग आता उजाड झाला आहे. इथे पाऊसदेखील कमी होतो.

ऍमेझॉन जंगल पूर्णपणे नष्ट केव्हा होईल याचा अंदाज संशोधकांना बांधता आलेला नाही. कारण हे जंगल खूप मोठ्या भागात पसरलं आहे. जंगलात अनेक जटिल प्रणाली आहेत. वृक्ष, नदी, वन्यजीव यांची प्रणाली वेगळी आहे. त्यामुळे संपूर्ण जंगलाबद्दल भाकीत करणं अवघड आहे.