हजारो किमीचा प्रवास, भयानक जंगल अन् सदैव मृत्यू समोर; डंकी रुटच्या मागचे भयंकर सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 23:10 IST2025-02-07T23:03:02+5:302025-02-07T23:10:53+5:30
America Donkey Route: अमेरिकेने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना देशातून बाहेर काढले आहे. त्यांना लष्कराच्या विमानाने भारतात सोडण्यात आले.

बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसलेल्या १०४ भारतीयांना सैन्य दलाच्या विमानात बसवून अमृतसर येथे सोडण्यात आलं. हे सर्व लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहोचले होते आणि त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नव्हती.
भारतात परतल्यानंतर या लोकांनी त्यांच्या खडतर प्रवासाच्या कहाण्या सांगितल्या आहेत. हे लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत कसे पोहोचले आणि या काळात त्यांना किती त्रास सहन करावा लागला हे या सर्व त्यांनी सांगितले. बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्यासाठी यापैकी अनेकांनी डंकी रुट वापरला होता.
डंकी रुट हा एक मार्ग आहे जो अनेक देशांमधून जातो. म्हणजेच जर एखाद्या भारतीयाला अमेरिकेत अवैधरित्या जायचे असेल तर तो दुसऱ्या देशातून अमेरिकेत पोहोचतो, या मार्गाला डंकी रूट असे म्हणतात. डंकी रुटने पोहोचण्यासाठी काही महिने लागतात. यासाठी लोक ट्रक, विमान किंवा बोटीने, पायी किंवा जंगलातून अवैधरित्या एका देशातून दुसऱ्या देशात जातात. पंजाब, हरियाणा, गुजरात आणि दक्षिणेतील काही राज्यांतील लोक या मार्गाने कॅनडा, ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये प्रवेश करतात.
यासाठी भारतातून ई-व्हिसा घेऊन तुर्कस्तानमार्गे एक मार्ग आहे. तुर्कस्तानमध्ये आधी लोक ९० दिवस राहतात. मग मेक्सिकोला जाऊन पायीच अमेरिका गाठतात. यासाठी ८० ते ९० लाख रुपये खर्च आहे. दुसरा डंकी रुट भारतातून आफ्रिका आणि नंतर लॅटिन अमेरिका मार्गे मेक्सिको असा आहे. या काळात लोक जंगल पार करून अमेरिकेत पोहोचतात. यामध्ये भारतातून जाणाऱ्या लोकांना ७० ते ७५ लाख रुपये खर्च करावे लागतात.
बऱ्याचदा डंकी रुटने जाणाऱ्यांचा प्रवास पश्चिम आशियातील दुबई किंवा शारजाहसारख्या विमानतळांवरून सुरू होतो. अझरबैजान किंवा तुर्की सारख्या देशांमधून प्रवासी पुढे जातात. अटलांटिक महासागर पार केल्यानंतर ते पनामाला पोहोचतात. यानंतर ते एल साल्वाडोरमार्गे मेक्सिकोत दाखल होतात. अमेरिकेत पोहोचण्यासाठी पनामाच्या घनदाट जंगलांमधून प्रवास करावा लागतो. ज्यात वाटेत असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. लोक जंगलात तंबूत राहत होते आणि पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकची मदत घेतात आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरु करतात.
स्थानिक एजंट ग्वाटेमाला ते मेक्सिकोपर्यंत टॅक्सींची व्यवस्था करतात. येथून ५००-६०० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी १२-१५ तास लागतात. प्रवाशांना अनेक चेकपोस्टवरून जावे लागते. यामुळे धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. स्थलांतरित लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून मेक्सिको सारख्या सीमेजवळील शहरांमध्ये पोहोचतात.
डंकी रुट चालवणारे एजंट विविध ठिकाणी काम करतात. प्रत्येक एजंटचे मर्यादित क्षेत्र असते ज्यामध्ये तो काम करतो. जर कोणाला भारतातून अमेरिकेत जायचे असेल तर तो आधी इथल्या एजंटशी संपर्क साधतो. हा एजंट पैसे, मार्ग, वेळ, देश आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित काम करतो. त्यानंतर प्रवाशाला दुबई किंवा इतर ठिकाणी नेले जाते. तिथे पोहोचल्यानंतर दुसरा एजंट बस किंवा टॅक्सीने दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो.
त्यानंतर लोकांना शेकडो किलोमीटर पायी चालत जावे लागते. वाटेत अनेक वेळा एजंट बदलले जातात. लोक अनेक देशांच्या सीमा बेकायदेशीरपणे पार करतात. शेवटी, अमेरिकेत पोहोचल्यावर, लोकांना स्वतःच अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.
डंकी रुटने अमेरिकेत पोहोचल्यानंतरही लोकांना प्रत्येक क्षण भीतीने घालवावा लागत आहे. त्यांच्याकडे व्हिसा किंवा वैध कागदपत्रे नसल्याने ते पकडले जाण्याची भीती नेहमीच असते. ते कसे तरी तिथे पोहोचतात, पण त्यांना अशा ठिकाणी काम करावे लागते जिथे त्यांना पोलिसांकडून कमी धोका असतो. पण अनेक वेळा ते पकडले जातात आणि त्यांना बराच काळ नजरकैदेत राहावे लागते.
डंकी रुट हा अजिबात सुरक्षित नाही. या मार्गाचा अवलंब करणाऱ्या लोकांना प्रत्येक पावलावर जीवाला धोका असतो. सीमा ओलांडताना अनेकवेळा हे लोक सुरक्षा दलाच्या गोळ्यांना बळी पडतात. याशिवाय कडाक्याची थंडी, भूक, अशक्तपणा यामुळेही अनेकांना जीव गमवावा लागतो.