Pakistan ला वाचवताना स्वत:च फसला Turkey; FATF च्या ग्रे लिस्टमध्ये तुर्कस्थानची एन्ट्री By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:00 AM 2021-10-22T10:00:14+5:30 2021-10-22T11:53:20+5:30
FATF puts Turkey on grey list : दहशतवादाला (Terrorism) प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला सातत्यानं मोठे झटके लागत आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचं मित्रराष्ट्र तर्कस्थानलाही मोठा झटका लागला आहे. दहशतवादाला (Terrorism) प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan) सातत्यानं धक्क्यावर धक्के मिळत आहेत. असं असलं तरी पाकिस्तान सुधरण्याचं नाव घेत नाही. पाकिस्तान सध्या FATF च्या ग्रे लिस्टमध्ये आहे.
पाकिस्तान सातत्यानं एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना अपयश मिळत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा पाकिस्ताला मोठा झटका लागला असून अनेक प्रयत्नांनंतरही पाकिस्तानला पुन्हा एकदा फायनॅन्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्यात आलं आहे.
एवढंच नाही तर यावेळी पाकिस्तानचं मित्रराष्ट्र तुर्कस्थानलाही धक्का बसला आहे. एफएटीएफने तुर्कीला मनी लाँडरिंग आणि दहशतवादाला आर्थिक मदत देण्याला आळा घालण्यात आलेल्या अपयशाबद्दल 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकलं आहे.
तुर्कस्थानशिवाय व्यतिरिक्त, जॉर्डन आणि माली यांनाही ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, तर बोत्सवाना आणि मॉरिशस यांना यादीतून वगळण्यात आले आहे.
पाकिस्तान आणि तुर्कस्थान हे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत, अशाच वेळी हा FATF चा हा निर्णय घेण्यात आला आहे. तुर्कस्थानचं चलन घसरलं आहे आणि महागाईदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
त्याचवेळी पाकिस्तानही आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीतही पाकिस्तानला कोणी कर्ज देण्यास तयार नाही. यापूर्वी एफएटीएफच्या बैठकांमध्ये तुर्कस्थाननं पाकिस्तानला ग्रे लिस्ट मधून बाहेर काढण्यासाठी समर्थन केलं होतं.
एफएटीएफने मनी लाँडरिंग आणि दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीविरोधातील लढाईतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तीन दिवसांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.
पाकिस्तान सातत्यानं ग्रे लिस्टमध्ये आहे. दहशतवादाविरोधातील ३४ कलमी अजेंड्यापैकी चार पूर्ण करण्यात पाकिस्तान सरकार अपयशी ठरले आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रानं बंदी घातलेल्या दहशतवाद्यांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. जून २०१८ मध्ये मान्य केलेला कृती आराखडा पूर्ण करेपर्यंत पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये राहील, असं एफएटीएफचे अध्यक्ष डॉ. मार्कस प्लीअर म्हणाले.
एफएटीएफने पाकिस्तानला दहशतवादाला आर्थिक मदत पूर्णपणे थांबवण्यासाठी ३४ कृती योजना पूर्ण करण्याची जबाबदारी दिली होती, परंतु पाकिस्तान अद्याप ते पूर्ण करू शकलेला नाही. संयुक्त राष्ट्रांद्वारे दहशतवादी घोषित केलेल्या मसूद अझहरसारख्यावरही कारवाईचा यात समावेश आहे.
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ही एक आंतरराष्ट्रीय देखरेख संस्था आहे, जी १९८९ मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील G7 देशांनी स्थापन केली. या संस्थेचं कार्य मनी लाँडरिंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला आर्थिक मदत पुरवठ्यावर नजर ठेवणे आणि त्यावर कारवाई करणं आहे. FATF च्या निर्णय घेणाऱ्या संस्थेला FATF प्लेनरी म्हणतात. त्याची बैठक वर्षातून तीन वेळा आयोजित केली जाते.
एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानचा राहिल्यानं त्याच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होणार हे निश्चित आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), जागतिक बँक आणि युरोपियन युनियनकडून आर्थिक मदत मिळवणेही पाकिस्तानला कठीण जाईल.
इतर देशांकडून पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदतही थांबू शकते. कारण कोणत्याही देशाला आर्थिकदृष्ट्या अस्थिर देशात गुंतवणूक करायची नाही.