Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनचे रुग्ण तिपटीने वाढले; 24 तासांत 10 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 09:08 AM2021-12-19T09:08:49+5:302021-12-19T09:28:31+5:30

Omicron Case In UK: ओमायक्रॉनचा सर्वाधिक फटका हा ब्रिटनला बसला असून तेथील परिस्थिती ही अत्यंत भीषण आहे.

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अत्यंत वेगाने पसरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील अनेक देशांत आता ओमायक्रॉन पसरला आहे.

ओमायक्रॉनचा सर्वाधिक फटका हा ब्रिटनला बसला असून तेथील परिस्थिती ही अत्यंत भीषण आहे. रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण हे आता तिपटीने वाढलेले पाहायला मिळत आहेत.

ब्रिटनमध्ये शनिवारी कोरोना व्हायरसचा धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉनच्या 10,059 प्रकरणांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ओमाक्रॉनची प्रकरणे तिप्पट आहेत. शुक्रवारी, यूकेमध्ये ओमायक्रॉनची 3,201 प्रकरणे नोंदवली गेली.

यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) द्वारे दैनिक आकडे प्रसिद्ध केले जातात. इंग्लंडमध्ये 9,427, उत्तर आयर्लंडमध्ये 514, स्कॉटलंडमध्ये 96 आणि वेल्समध्ये 22 प्रकरणे आढळून आली. यासह, युनायटेड किंगडम (यूके) मध्ये ओमायक्रॉन प्रकरणांची एकूण संख्या 24,968 झाली आहे.

ब्रिटनमध्ये शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी 93,045 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. नवीन प्रकरणांमध्ये, कोरोनाच्या ओमाक्रॉन प्रकारासह, डेल्टाची प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी कोविड-19 च्या विक्रमी रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाची चिंताही वाढली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, युनायटेड किंगडम (यूके) मध्ये आतापर्यंत एकूण 1.11 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणामुळे लसीकरणावर भर दिला आहे. ते म्हणाले की, जलद लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, बूस्टर डोसही दिला जात आहे.

स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉन प्रकाराबद्दल खूप चिंता आहे. एका आठवड्यापूर्वी ओमायक्रॉनने जो इशारा दिला होता त्याचा परिणाम आता आपल्यावर होऊ लागला आहे.

वेल्सचे नेते मार्क ड्रेकफोर्ड यांनी नागरिकांना ओमायक्रॉन प्रकाराशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. लोकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

26 डिसेंबरनंतर देशातील नाईट क्लब बंद होतील. दुकाने आणि कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे असं देखील मार्क ड्रेकफोर्ड यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही अमेरिकेत आहे. तेथे आतापर्यंत तब्बल आठ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनने थैमान घातलेले असताना हा आकडा अत्यंत धडकी भरवणारा आहे.

अमेरिकेमध्ये तब्बल 78 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. साधारण वर्षभरानंतर पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कोरोना हा वृद्धांसाठी काळ ठरत असल्याचं समोर आलं आहे.

वृद्ध लोकांसाठी कोरोना अधिक खतरनाक आणि जीवघेणा आहे. आठ लाख कोरोना मृतांपैकी जवळपास 75 टक्के म्हणजेच सहा लाख लोक हे 65 वर्षांवरील आहेत. यातून कोरोना किती घातक असल्याचं स्पष्ट होत आहे.

अमेरिकेतील तब्बल 20 कोटींहून अधिक लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या आणखी एका लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर हा दिला जात आहे.