एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 09:15 AM2020-05-21T09:15:04+5:302020-05-21T09:24:37+5:30

सापडलेल्या या बॅगांमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. पण त्या कुटुंबीयांनी प्रामाणिकपणा दाखवत ते पैसे पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, अनेक देशांची अवस्था बिकट आहे. अमेरिका, इटलीसारख्या देशांमध्ये लॉकडाऊन असल्यानं सगळेच व्यवहार ठप्प आहेत.

या संकटाच्या काळातही अमेरिकेतल्या एका कुटुंबाला कचराकुंडीत दोन बॅगा सापडल्या आहे. विशेष म्हणजे या बॅगांमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत.

पण त्या कुटुंबीयांनी प्रामाणिकपणा दाखवत ते पैसे पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. आता त्यांच्या प्रामाणिकपणाचं सगळीकडूनच कौतुक होत आहे. व्हर्जिनियाचे डेव्हिड आणि एमिली शान्त्झ मुलांसह कॅरोलिन काउंटीतील त्यांच्या घराकडे पिकअप ट्रकनं जात होते.

त्याचदरम्यान वाटेत थोडा पुढे गेल्यावर त्यांना रस्त्याच्या कडेला कचराकुंड्यातील दोन बॅगा दिसल्या. डेव्हिडने गाडी थांबवली आणि बॅगा उचलल्या.

त्यावर सरकारी शिक्के होते. जे अमेरिकेच्या टपाल खात्याचे होते. डेव्हिडनं ती बॅग उचलली आणि ती गाडीत ठेवली, मग त्यानं गाडी चालू करून घर गाठलं.

जेव्हा डेव्हिड आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याने बॅग उघडली. त्यामध्ये दहा लाख डॉलर्स किंवा सुमारे 7.50 कोटी रुपये प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये ठेवण्यात आले होते.

प्लास्टिकच्या पिशव्यावर रोख तिजोरी असं लिहिलेलं होतं. त्यानंतर त्यांनी याविषयी कॅरोलिन काउंटी पोलिसांना कळविले. थोड्याच वेळात पोलिसांची टीम त्याच्या घरी पोहोचली.

कॅरोलिन शेरिफ मेजर स्कॉट मॉसर यांनी सांगितले की, हे पैसे रस्त्यावर कसे पडले हे आम्ही शोधत आहोत.

मोसेर म्हणाले की डेविड आणि एमिलीची प्रामाणिकता ही कोरोनाच्या या संकटातही लोकांसाठी एक उदाहरण आहे.

एवढे पैसे मिळून ते पोलिसांच्या स्वाधीन केल्यानं या दाम्पत्याच्या प्रामाणिकपणाला पोलिसांनीही सलाम ठोकला आहे.