अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस; पाहा ट्रम्प समर्थकांचं हिंसक कारस्थान

By जयदीप दाभोळकर | Published: January 7, 2021 12:51 PM2021-01-07T12:51:35+5:302021-01-07T12:58:48+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन येथील कॅपिटल हिलमध्ये घुसखोरी केली. तसंच त्या ठिकाणी मोठी तोडफोडही केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहात सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. जो बायडेन हे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेणार आहेत. त्यापूर्वीच ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टन मार्च काढला आणि कॅपिटल हिलवर हल्लाबोल केला. (सर्व फोटो - रॉयटर्स)

ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये तोडफोड केल्यानंतर सर्व सीनेटर्सनादेखील बाहेर काढलं. तसंच इमारतीवर ताबा मिळवला. यावेळी त्यांच्याकडून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावर कायम ठेवावं आणि पुन्हा मतमोजणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसलं त्यावेळी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराचा मारा केला. याव्यतिरिक्त पोलिसांना ट्रम्प समर्थकांकडे बंदुकाही सापडल्या. या घटनेनंतर जगभरातून या हिंसाचाराचा विरोध करण्यात आला.

वॉशिंग्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू हा पोलिसांच्या गोळीबारात झाल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारानंतर वॉशिंग्टनमध्ये पब्लिक इमरजन्सी लागू करण्यात आली.

या हिंसाचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करत त्यांना माघारी परतण्याचं आवाहन केलं. परंतु त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये निडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्या ट्वीटमुळे हिंसाचार अजून वाढू नये यासाठी ट्विटरनं त्यांचं अकाऊंट ब्लॉक केलं आणि यूट्यूबनंही त्यांचे व्हिडीओ हटवले.

२०२० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अद्याप राजकीय पेच सुरूच आहेत. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता.

यातच आता डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेतील ट्रम्प समर्थकांमुळे २०० वर्षांनंतर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली.

असाच एक हल्ला इंग्रजांनी अमेरिकेच्या संसदेच्या इमारतीवर केला होता. त्यावेळी घुसखोरांनीी वॉशिंग्टनमध्ये जाळपोळही केली होती. तसंच त्यांच्याकडून संसदेच्या इमारतीला नुकसान पोहोचवण्याचाही प्रयत्न केला होता.

या हिंसाचारादरम्यान पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस यांच्यावर बायडेन यांना विजयाचं प्रमाणपत्र न देण्याचा दबाव आणत होते असं सांगण्यात येत आहे.

सध्या संपूर्ण परिस्थितीवर ताबा मिळवण्यात आला असून कॅपिटल बिल्डींगच्या सुरक्षेसाठी नॅशनल गार्ड्सना तैनात करण्यात आलं आहे.

Read in English