Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत? By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 12:20 PM 2024-11-06T12:20:22+5:30 2024-11-06T12:46:05+5:30
Sunita Williams And US Election 2024 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील सुनीता विलियम्स आणि नासाच्या इतर अंतराळवीरांनी अंतराळातून मतदान केलं आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील सुनीता विलियम्स आणि नासाच्या इतर अंतराळवीरांनीही अंतराळातून मतदान केलं आहे.
अंतराळवीरांनी कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील त्यांच्या आवडत्या उमेदवाराची निवड करण्यासाठी फक्त मतदानच केलं नाही तर इतर लोकांनाही मतदान करण्याचं खास आवाहन केलं आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सध्या नासाचे चार अंतराळवीर आहेत. त्यांच्यामध्ये सुनीता विलियम्सही आहेत ज्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे ISS वर अडकल्या आहेत, याशिवाय स्पेसएक्स क्रू-९ चे डॉन पेटिट, निक हेग, बुच विल्मोर देखील आहेत.
सुनीता विलियम्स यांनी मतदान करणं ही एक आपली जबाबदारी असल्याचं म्हटलं आणि अंतराळातून हे करू शकण्याचा अनुभव अद्वितीय असल्याचं वर्णन केलं आहे. सुनीता आणि बुच विल्मोर हे दोघेही ५ जूनपासून ISS वर अडकले आहेत.
स्पेसमध्ये मतदान करण्याची प्रक्रिया काय असते? ग्रहाबाहेर राहणाऱ्या अंतराळवीरांना निवडणुकीत भाग घेण्यासाठी NASA ने NASA स्पेस कम्युनिकेशन्स आणि नेव्हिगेशन प्रोग्रामची सोय केली आहे. या अंतर्गत, जेव्हा एखादा अंतराळवीर एखाद्या मोहिमेवर जातो तेव्हा त्याला मतदान करण्यासाठी आधीच रजिस्ट्रेशन करावं लागतं.
अंतराळवीराला यासाठी पोस्टकार्ड अर्ज भरावा लागतो. हा अर्ज इतर नागरिकांद्वारे देखील भरला जाऊ शकतो जे एकतर कामासाठी देशाबाहेर आहेत. सुनीता विलियम्स अंतराळात गेल्यावर निवडणुकीपर्यंत त्या तिथेच राहणार हे त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांना अर्ज करता आला नाही. सुनीता तिथे अडकल्या असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
स्पेसमधून कसं दिलं जातं मत? सर्वप्रथम, नासा कोणत्याही मोहिमेवरील अंतराळवीरासोबत पुरेसा संपर्क आहे की नाही हे तपासते, जेणेकरून ते वेळेच्या मर्यादेत आपलं मत देऊ शकतील. त्यासाठी ह्युस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये टेस्टसाठी मतपत्रिका पाठवली जाते.
ISS मध्ये अंतराळवीराला ती पाठवली जाते आणि अंतराळवीर मतदान करून मतपत्रिका परत पाठवण्यासाठी सक्षम आहे की नाही याची चाचणी केली जाते. ती चाचणी पास झाली तरच खरी मतपत्रिका पाठवली जाते.
कशी पूर्ण होते प्रक्रिया? बॅलेट पेपर अंतराळवीरापर्यंत पोहोचल्यानंतर अंतराळवीर मतदान करतात. त्यानंतर या बॅलेटचं एनक्रिप्टेड व्हर्जन आयएसएसच्या कम्पुटर सिस्टमवर अपलोड केलं जातं.
NASA च्या TDRS म्हणजेच Tacking And Data Relay Satellite च्या मदतीने ते न्यू मेक्सिकोमध्ये असलेल्या ग्राउंड टर्मिनलवर पोहोचतं. येथून लँडलाइनच्या मदतीने, ते ह्यूस्टनमधील नासाच्या जॉन्सन स्पेस स्टेशनवर ट्रान्समिट केलं जातं आणि तेथून ते काऊंटी क्लार्कपर्यंत पोहोचतं.
खरा बॅलेट पेपर अंतराळवीराला एनक्रिप्टेड करून पाठवला जातो. प्रत्येक अंतराळवीराला मतपत्रिका स्वतंत्रपणे पाठवली जाते आणि प्रत्येक व्यक्तीचा कोड वेगळा असतो.
ही एक इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका आहे जी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरली जाते आणि ईमेलद्वारे परत पाठविली जाते. क्लार्ककडे प्रत्येक मतपत्रिकेसाठी एक वेगळा पासवर्ड देखील असतो, जो कोणत्याही प्रकारे मताशी छेडछाड होणार नाही याची खात्री करतो.
याआधीही अंतराळातून मतदान झालं आहे, डेव्हिड वुल्फ यांनी १९९७ मध्ये पहिल्यांदा अंतराळातून मतदान केलं होतं. तेव्हापासून अंतराळवीर अशाप्रकारे मतदान करत आहेत.
सुनीता विलियम्स यांनी यापूर्वी २०१६ आणि २०२० मध्ये असं केलं आहे. सुनीता विलियम्स आणि विच आता २०२५ पर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहणार आहेत.