Colonial Pipeline: अमेरिकेशी पंगा घेणं पडलं भारी; रशियन हॅकर्सकडून वसूल केले ४ लाख डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:44 PM2021-06-09T15:44:24+5:302021-06-09T15:49:54+5:30

Colonial Pipeline: खंडणीस्वरुपात दिलेली रकमेपैकी मोठी रक्कम पुन्हा वसूल करण्यास सुरुवात केली आहे, असे सांगितले जात आहे.

अलीकडेच अमेरिकेच्या एका इंधन वाहून नेणाऱ्या पाईपलाइनवर मोठा सायबर हल्ला करण्यात आला होता. काही काळासाठी ही पाइपलाइन बंद करण्यात आली होती.

या सायबर हल्ल्यात १०० जीबी डेटाची चोरी करण्यात आली होती. डेटा परत मिळवण्यासाठी कंपनीने ४.४ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३२ करोड २० लाख रुपयांची खंडणी दिली होती.

अमेरिकेतील या कंपनीचे नाव कोलोनियल. अमेरिकेतील एका अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, खंडणीस्वरुपात दिलेली रकमेपैकी मोठी रक्कम पुन्हा वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

रशियन हॅकर्सनी ही कोट्यावधींची रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली होती. अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांनी ४ मिलियन डॉलरचे ७५ बिटकॉइन शोधून काढले आहेत.

पाईपलाईनवर केलेल्या सायबर हल्ल्यामुळे अमेरिकेत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. बायडेन यांच्या प्रशासनाने न्याय विभागाच्या अंतर्गत एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती केली होती.

या टास्क फोर्समधील अधिकाऱ्यांनी खंडणीचा मागोवा घेतला आणि त्यानंतर डार्कसाइडवरील २३ वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक खात्यांचा तपास करण्यास सुरुवात केली. यामधून सुमारे ६३.७ बिटकॉइन जप्त करण्यात आले.

नफ्यासाठी अगदी संपूर्ण शहरांना ओलिस ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक वापर करण्यात येत आहे. २१व्या शतकातील हे मोठे आव्हान आहे असे डिप्टी अ‍ॅटर्नी जनरल लिसा मोनाको यांनी सांगितले.

खंडणी आणि इतर सायबर-हल्ले रोखण्यासाठी आम्ही आमची सर्व उपकरणे व संसाधनांचा वापर सुरू ठेवणार आहोत, असेही लिसा मोनाको यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात ७ मे रोजी सायबर हल्ल्यानंतर कंपनीच्या एका कर्मचार्‍यास नियंत्रण कक्षातील कॉम्प्युटर हॅकर्सकडून खंडणीचे पत्र पाठवले होते.

कंपनीवर जेव्हा सायबर हल्ला झाला तेव्हा जवळपास पाच दिवस या सेवा खंडित झाल्या होत्या. त्याचा थेट परिणाम देशातील इंधन पुरवठ्यावर झाला.