डंकी रूटनं अमेरिकेत पोहचणारे काय काम करतात?; वार्षिक कमाईचा आकडा पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 09:04 IST2025-02-07T08:53:15+5:302025-02-07T09:04:52+5:30

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत सत्तेत आल्यापासून बेकायदेशीर स्थलांतरितांवर टांगती तलवार लटकली आहे. अमेरिकेतून स्थलांतरितांना त्यांच्या देशात पाठवले जात आहे परंतु ज्यारितीने या लोकांना पाठवले जातंय, त्यावरून अनेक प्रश्न उभे राहिलेत. अमेरिकेने नुकतेच १०४ भारतीय स्थलांतरितांना भारतात पाठवले. त्यांना बुधवारी दुपारी अमेरिकन लष्करी विमानाने अमृतसरला सोडण्यात आले.

नागरिकता कायद्यावर ट्रम्प सरकार कठोर पाऊले उचलत आहे. त्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या १४ लाख स्थलांतरीत कारवाईच्या सावटाखाली जगत आहे. हे लोक अमेरिकेला पोहचले कसे, ते तिथे काय करतात हा प्रश्न अनेकांना पडला. हे सर्व बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसले असून या निमित्ताने पुन्हा एकदा अमेरिकेत जाणारा डंकी रूट चर्चेत आला आहे.

डंकी रूट असा मार्ग असतो, जो अनेक देशातून जातो. जर एखादा भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत जात असेल तर तो एखाद्या दुसऱ्या देशातून अमेरिकेपर्यंत पोहचतो. डंकी रूटच्या माध्यमातून लोक ब्रिटन, अमेरिका, कॅनडासारख्या युरोपियन देशात पोहचतात. हे लोक ट्रक, विमान, बोट, पायपीट करत जंगलाच्या मार्गाने एका देशातून दुसऱ्या देशात जातात.

हा मार्ग बेकायदेशीर असून त्यात धोकाही तितकाच जास्त आहे. अनेकदा मृत्यूलाही सामोरे जावं लागतं. यात अनेक देशांच्या सीमेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करायची असते. बऱ्याचदा सीमेवर तैनात जवान घुसखोरी करणाऱ्यांना गोळी मारतात. काही जण भीषण थंडी आणि भूकेने जीव तोडतात.

डंकी रूटमार्गे लोकांना परदेशात नेणारे मोठे रॅकेट आहे. त्यात ट्रॅव्हल एजेन्सीचाही समावेश असतो. त्यातून बराच पैसा कमावला जातो. डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत पोहचण्यासाठी लोक ५०-६० लाख रुपये किंमत मोजतात. अमेरिकेत पोहचून तिथे काम करून पैसा कमावणे हेच या लोकांचं स्वप्न असते. मात्र त्यासाठी त्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

डंकी रूटवरून अमेरिकेत पोहचणारे बहुतांश कमी शिकलेले असतात. Unskilled असल्याने परदेशातही त्यांना तशीच कामे मिळतात. बहुतांश लोक रेस्टॉरंटमध्ये हेल्पर, भांडी धुणे, घरांमध्ये नोकर बनणे, लहान मुलांना सांभाळणे, छोट्या मोठ्या दुकानात साफसफाई करणे, गाडी क्लिनिंग, पेट्रॉल पंप, बांधकाम क्षेत्रात मजुरी, गोदामात पॅकेजिंग करणे अशी कामे करतात. इथं त्यांना कागदपत्रे मागितली जात नाहीत.

डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत पोहचणाऱ्यांना कमी वेतनात काम करावे लागते, कारण यांना कामावर ठेवणाऱ्यांनाही ते घुसखोरी करून देशात राहत आहेत हे माहिती असते. त्यामुळे ते कमी पगारात काम करून घेतात. दोघांनाही गरज असल्याने ते अमेरिकेत कित्येक वर्ष वास्तव्य करतात.

एका अंदाजानुसार, या प्रकारचे काम करणारे लोक वर्षाला ५०-६० लाख कमाई करतात. अमेरिकेत कायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना या कामासाठी १.२५ कोटीहून अधिक पगार दिला जातो. डंकी रूटने अमेरिकेत पोहचलेल्यांना कमी पगारात जास्त काम करावे लागते. कारण तिथे लपून राहण्यासाठी हे करणे त्यांची मजबुरी असते.

या लोकांना रोकड पैसे दिले जातात आणि त्यांची ओळख लपवली जाते. हे लोक अशाठिकाणी राहतात जिथे पोलिसांची वर्दळ कमी असते. अमेरिकेत पोहचणं जितकं कठीण असते तितके तिथे बेकायदेशीरपणे राहणे संघर्षमय असते. पोलीस किंवा अमेरिकन अधिकारी यांची नजर लपवून त्यांना जीवन जगावं लागते.

हे लोक अमेरिकन लोकांमध्ये फार मिसळत नाहीत. त्यांचं बँक अकाऊंट नसते, त्यामुळे सर्व व्यवहार रोखीने करावे लागतात. मेडिकल इमरजेन्सी असेल तर हॉस्पिटलला जायलाही घाबरतात, कारण तिथे कागदपत्रे मागितली जातात. अमेरिकेत अनेकदा पोलीस अशा लोकांना पकडण्यासाठी अभियान राबवतात. जर त्यांना पकडले तर डिटेंक्शन सेंटरला पाठवले जाते तिथून त्यांना आलेल्या देशात पाठवले जाते.