'या' ५ मुख्य कारणांमुळे Joe Biden यांना घ्यावी लागली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 02:10 PM2024-07-22T14:10:35+5:302024-07-22T14:29:44+5:30

Joe Biden back out 5 reasons: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आता बायडेन यांच्या जागी कमला हॅरिस यांचे नाव चर्चेत आहे.

वाढलेले वय आणि बोलण्यातील चुका यामुळे वादात असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. सोशल मीडियावर पत्र लिहून त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार करण्यात आले आहे. पाहूया जो बायडेन यांना माघार का घ्यावी लागली, याची ५ प्रमुख कारणे.

बायडेन यांच्या उमेदवारीबाबत डेमोक्रॅटिक पक्षामध्येच वाढता विरोध होता. प्रचारातील फेऱ्यांमध्ये ट्रम्प यांच्यापेक्षा मागे राहिल्यानंतर पक्षातील काहींनी बायडेन यांना माघार घेण्याचा सल्ला दिला होता. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनीही बायडेन यांच्या घटत्या पाठिंब्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. बायडेन यांच्यावर निवडणूक लढवू नये यासाठी पक्षांतर्गत दबाव होता अशी चर्चा होती.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर बायडेन यांच्या लोकप्रियतेत घट झाली. कारण प्राणघातक हल्ल्यामुळे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना सहानुभूतीपूर्वक मिळणारा पाठिंबा वाढला. ट्रम्प यांच्या समर्थकांनी हा हत्येचा प्रयत्न असल्याचा प्रचार प्रभावीपणे केला. त्याचा थेट परिणाम नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर दिसण्याची दाट शक्यता दिसत होती.

जो बायडेन यांचे वाढते वय आणि स्मरणशक्तीच्या तक्रीर यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले. बायडेन सार्वजनिक ठिकाणी अनेकदा अडखळताना, तोल जाताना दिसले. त्यांच्या प्रकृतीबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच, NATO समीटमध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पुतीन असे संबोधले होते. इतकेच नव्हे तर ते त्यांच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे नावही विसरले होते. या सर्व मुद्द्यांचा प्रचारात विरोधक वापर करत असल्याचे दिसले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारांमधील वादविवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात गेल्या महिन्यात वादविवाद झाला. यात बायडेन बोलत असताना अनेकवेळा अडखळले. बऱ्याच वेळा, ते उत्तरे देताना विचार करताना दिसले. या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्या खराब प्रकृतीवर सातत्याने टीका केली. त्यांना 'वयस्क' संबोधले. तसेच वादविवादातील पराभवानंतर बायडेन यांना निवडणूक प्रचारासाठी मिळणाऱ्या निवडणूक निधीतही घट झाल्याचे वृत्त होते. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक देणगीदारांनी बायडेन यांच्या निवडणूक प्रचारासाठी देणगी न देण्याचा निर्णय घेतला.

जो बायडेन यांची खराब प्रकृती हे त्यांच्या माघारीचे एक कारण नक्कीच असू शकते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ८१ वर्षांचे आहेत आणि ते अनेक प्रसंगी तंदुरूस्त नसल्याचे दिसले. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की जो बायडेन हे दिवसातून फक्त ६ तासच काम करू शकतात. कारण वयोमानानुसार त्यांना थकवा जाणवू लागतो. काही दिवसांपूर्वीच बायडेन यांनी स्वत: सांगितले होते की, जर डॉक्टरांनी त्यांना 'अनफिट' घोषित केले तर ते माघार घेतील. या सर्व गोष्टींचा परिणाम आजच्या निर्णयात दिसून येतो.