पंतप्रधानांना हटवण्यासाठी सोलोमनमध्ये भीषण हिंसाचार, संसदेला लावली आग, सरकारवर ३६ तासांचे लॉकडाऊन लावण्याची आली वेळ By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 05:51 PM 2021-11-25T17:51:16+5:30 2021-11-25T17:55:05+5:30
Parliament Set Fire In Solomon Islands: पॅसिफिक महासागरामधील असलेल्या सोलोमन या देशामध्ये आंदोलकांनी संसद भवन आणि एका पोलीस ठाण्याला आग लावली. हे आंदोलक पंतप्रधानांना पदावरून हटवण्याची मागणी करत होते. पॅसिफिक महासागरामधील असलेल्या सोलोमन या देशामध्ये आंदोलकांनी संसद भवन आणि एका पोलीस ठाण्याला आग लावली. हे आंदोलक पंतप्रधानांना पदावरून हटवण्याची मागणी करत होते. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि लुटालूट झालेली पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच रबराच्या गोळ्याडी झाडल्या. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजधानी होनियारामध्ये ३६ तासांचे लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
आंदोलकांनी अनेक दुकानांमध्ये लुटालूट केली. त्यामुळे देशात तणावाचे वातावरण आहे. पंतप्रधान मनश्शे सोगावारे यांनी बुधवारी उशिरा देशाला संबोधित करताना राजधानीमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
काही बेटांचा समूह असलेल्या या देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या माल्टा बेटावरील लोकांनी राजधानीत येऊन अनेक स्थानिक मुद्दे उपस्थित करत आपला राग व्यक्त केला. तेथील लोकांना विकासात मागे राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हल्लीच हा देश चीनच्या जवळ आला आहे.
सोलोमन बेटांनी २०१९ मध्ये तैवानसोबतचे आपले संबंध तोडले होते. तसेच चीनसोबत औपचारिक संबंध स्थापित केले होते. तेव्हापासूनच तिथे खूप विवादाची परिस्थिती आहे. पंतप्रधान सोगावारे यांनी सांगितले की, आमच्या देशाने अजून एक दु:खद आणि दुर्भाग्यपूर्ण घटना पाहिली. यामध्ये लोकशाही मार्गाने निवडलेले सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले गेले.
पंतप्रधान सोगावारे यांनी सांगितले की, मी विचार केला होता की, इतिहासातील वाईट दिवस निघून गेले आहे. मात्र आजच्या घटनेने आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, हे दाखवून दिले. त्यांनी सांगितले की, देशातील लॉकडाऊन हे शुक्रवारी सकाळी सात वाजेपर्यंत कायम राहील. या दरम्यान हिंसा करणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. तसेच भविष्यात असे होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील. या हिंसाचारामध्ये एका चिनी व्यक्तीचे दुकान लुटल्याचेही समोर आले होते.
रॉयल सोलोमन आयलाँड्स पोलीस फोर्स ने होनियाराच्या आसपासच्या शाळा बंद केल्या आहेत. तसेच लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. आमच्या क्षेत्रातील रस्ते, शाळा आणि व्यवसाय लॉकडाऊननंतर त्वरित उघडावेत, हे निश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे उपायुक्त जुनीता मटंगा यांनी सांगितले.