Vladimir Putin: पुतीन यांचा पगार किती? ७५ अब्जांचा नुसता राजवाडा; एकूण संपत्ती पाहून डोळे दिपतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 05:26 PM2022-03-01T17:26:24+5:302022-03-01T17:29:25+5:30

Vladimir Putin: पुतीन यांची आलिशान जीवनशैली नेहमीच चर्चेत; संपत्तीचा आकडा डोळे विस्फारून टाकणारा

युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांचा रोष ओढवून घेतला. अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा यांनी रशियावर निर्बंध लादले. मात्र त्याचा कोणताही परिणाम रशियावर झालेला नाही.

पुतीन यांची जीवनशैली अतिशय विलासी आहे. अध्यक्ष म्हणून पुतीन यांना १.४० लाख डॉलर इतका पगार मिळतो. भारतीय चलनात बोलायचं झाल्यास १.०५ कोटी रुपये. Caknowlegde वेबसाईटनुसार पुतीन यांना वर्षाकाठी २.४० लाख डॉलर म्हणजेच १.८० कोटी रुपये मिळतात. पंतप्रधान मोदींचं वार्षिक वेतन २० लाखापेक्षाही कमी आहे.

पुतीन त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्याकडे असलेल्या सुपरयॉटची किंमत तब्बल ७५० कोटी रुपये इतकी आहे. ग्रेसफुल असं या सुपरयॉटचं नाव. रशियन नौदलासाठी पाणबुड्या तयार करणाऱ्या सेवमाश कंपनीनं ग्रेसफुलची बांधणी केली आहे.

ग्रेसफुलवर हेलिपॅड, डायनिंग एरिया, कॉकटेल बार यासारख्या सुविधा आहेत. जगातील ४०० उत्तम प्रकारच्या वाईन यॉटमधील बारमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी जर्मनीजवळ ही यॉट नांगरुन ठेवण्यात आली होती. मात्र निर्बंधांचा अंदाज आल्यानं ती जर्मनीहून रशियाला रवाना झाली.

पुतीन यांच्या दिमतीला असलेल्या विमानाची किंमत तब्बल ३ हजार कोटी रुपये आहे. फ्लाईंग क्रेमलिन असं या विमानाचं नाव आहे. निओ क्लासिकल स्टाईलमध्ये ते तयार करण्यात आलं आहे.

गार्डियनच्या वृत्तानुसार 'फ्लाईंग क्रेमलिन'मधील टॉयलेटची किंमत ३५ लाखांच्या घरात आहे. हे विमान तासाला ५९० मैल अंतर कापू शकतं. विमानात जिम, तीन बेडरुम आहेत. पुतीन संपूर्ण लष्कराला नियंत्रणात ठेऊ शकतात अशा सर्व सुविधा विमानात आहेत.

राजकारणात येण्याआधी पुतीन सोव्हियत महासंघाची कुख्यात गुप्तचर संघटना केजीबीमध्ये कार्यरत होते. सैनिकी आणि गुप्तचर कारवायांचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. आपली लष्करी कौशल्यं ते अनेकदा दाखवून देतात. काही दिवसांपूर्वीच पुतीन यांनी फिनलँडच्या खाडीत एक पाणीबुडी चालवली होती.

पुतीन यांचे विरोधक असलेल्या अलेक्झाई नवलानी यांनी पुतीन यांच्या आलिशान महालाचे ५०० फोटो समोर आणले होते. काळ्या समुद्राशेजारी असलेल्या या बंगल्याची किंमत १ बिलियन डॉलर म्हणजेच ७५ अब्ज रुपये इतकी आहे. पुतीन यांच्या खासगी वापरासाठी महालाची उभारणी करण्यात आली आहे.

पुतीन यांच्या महालात मार्बलनं तयार करण्यात आलेला स्विमिंग पूल आहे. युनान देवतांच्या मूर्तींनी महाल सजवण्यात आला आहे. वाईन सेलार, थिएटर, क्लबसारख्या सुविधा महालात आहेत. पुतीन यांचा महाल १४ व्या किंग लुईसच्या राजवाड्याची आठवण करून देतो.