७ लाख डॉलर्सची घड्याळं, सुपर यॉट, ७०० गाड्या, आलिशान महाल, पाहा किती आहे पुतीन यांची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 09:03 AM2022-03-24T09:03:27+5:302022-03-24T09:18:38+5:30

Russia Vladimir Putin Wealth : इनव्हेस्टमेंट आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हरमिटेज कॅपिटस मॅनेजमेंटनं २०१७ मध्येच पुतीन यांच्याकडे २०० अब्ज डॉलर्सची खासगी संपत्ती असल्याचा दावा केला होता.

Russia Vladimir Putin Wealth : सध्या सर्वत्रच रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची चर्चा होताना दिसतेय. एक महिना पूर्ण होत आला असून युक्रेन ताब्यात घेण्यात रशियाला अपयश आलं आहे. परंतु यामुळे युक्रेनमधील सुमारे ४५ दशलक्ष लोकांचं जीवन मात्र असह्य करून टाकलं आहे.

लाखो लोकांनी युक्रेन सोडून पोलंडसह शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनच्या लोकांमध्ये मोठी भीतीही निर्माण झाली आहे. युद्धादरम्यान लोक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

रशियानं केलेल्या या हल्ल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी कायमच आपलं व्यक्तीमत्त्व आणि केजीबी (KGB) अधिकाऱ्याच्या रुपातील आपला भूतकाळ यामुळे जगाला आपल्याकडे आकर्षित केलंय. त्यांच्या सध्याच्या जीवनशैलीवर एक नजर टाकूया.

पुतीन यांचे व्यक्तिमत्व जगासाठी नेहमीच एखाद्या रहस्याप्रमाणे राहिलं आहे. फॉर्च्युननुसार, रशियन सरकार पुतिन यांना केवळ १.४ लाख डॉलर्स दिले जातात. पुतिन यांच्या संपत्तीमध्ये ८०० चौरस फुटांचे अपार्टमेंट, एक ट्रेलर यांचाही समावेश आहे. परंतु ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जातात आणि त्यांची जीवनशैलीही याची साक्ष देते.

इनव्हेस्टमेंट आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हरमिटेज कॅपिटस मॅनेजमेंटनं २०१७ मध्येच पुतीन यांच्याकडे २०० अब्ज डॉलर्सची खासगी संपत्ती असल्याचा दावा केला होता. कंपनीचे सीईओ बिल ब्राउडर यांनी अमेरिकन सिनेटच्या न्यायिक समितीसमोर हा दावा केला आहे.

पुतिन यांचा विरोधी गट सॉलिडॅरिटीने जारी केलेल्या व्हिडीओच्या आधारे एबीसी न्यूजने एक अहवाल तयार केला होता. या अहवालात पुतीन यांच्याकडे ७ लाख डॉलर्सची आलिशान घड्याळं असल्याचं सांगण्यात आलं होतं. यामध्ये पाटेक फिलिप (Patek Philippe) च्या परपेचुअल कॅलेंडर(Perpetual Calendar) ज्याची किंमत ६० हजार डॉलर्स आहे आणि ५ लाख डॉलर्सच्या लँग अँड सोहन टूबोग्राफ (Lange & Sohne Toubograph) च्या घड्याळांचा समावेश आहे.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे १.९० लाख स्क्वेअर फुटांचा आलिशान महालदेखील आहे. अनेकदा त्यांच्या या महालाबद्दल माध्यमांमध्ये वृत्तही आलं आहे. नाईट क्लब, स्विमिंग पूल यासह ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा अनेक गोष्टी त्याठिकाणी आहेत.

पुतीन यांना विरोध करणाऱ्या नेत्यांनी या महालाचे फोटोही अनेकदा प्रसिद्ध केले होते. त्यात असलेल्या डायनिंग रुम फर्निचरची किंमत ५ लाख डॉलर्स, ५४ हजार डॉलर्सचं बार टेबल असल्याचं सांगण्यात आलंय. परंतु दबाव वाढल्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यात रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आर्केडी रोटेनवर्ग यांनी आपण या महालाचे खरे मालक असल्याचं म्हटलं होत.

ब्लॅक शीच्या या पॅलेसशिवाय पुतीन १९ घरांचे मालक आहेत. त्यांच्याकडे ७०० कार्स, ५८ विमानं आणि हेलिकॉप्टर आहेत. त्यांच्या एका विमानाचे नाव आहे 'फ्लाइंग क्रेमलिन' असं आहे. त्याची किंमत ७१.६ कोटी डॉलर्स इतकी आहे.

यामध्ये सोन्याचे टॉयलेटही तयार करण्यात आलंय. द गार्डियनने एक फोटो प्रकाशित केला होता. या फोटोमध्ये १४० मीटर लांब आणि ६ मजली यॉट दिसत आहे. तसंच या यॉटचे मालक पुतीन असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची किंमत ७० कोटी डॉलर्स असल्याचं सांगण्यात आलंय.

पुतीन यांनी आपल्या मित्रांनाही भरपूर पैसे कमावण्याची संधी दिल्याचं म्हटलं जातं. भ्रष्टाचारविरोधी मोहीम चालवणाऱ्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये रशियन अब्जाधीशांनी २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असल्याचा खुलासा केला आहे.

२०१८ मध्ये, इंग्लंडच्या परराष्ट्र व्यवहार समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की इंग्लंडमध्ये खरेदी केलेल्या २० टक्के मालमत्तांमध्ये रशियन पैशाचा वापर करण्यात आला होता. रशियन अब्जाधीशांच्या वास्तविक गुंतवणुकीचा हा केवळ एक छोटासा भाग असू शकतो, असंही त्यात सांगण्यात आलंय.

पुतीन यांचे मित्र आणि त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये कायम दिसणारे रोमन अब्रामोविच हे चेल्सिया फुटबॉल क्लबचे मालक आहेत. केजीबीमधील पुतीन यांच्या मित्राचा मुलगा हा एका वृत्तपत्राचा मालकही आहे. अशा अनेक लोकांची संपत्ती गेल्या १०-२० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली.