कोरोनाची माहिती घेण्यासाठी वुहान मार्केटमध्ये आम्ही गेलो पण...; चिनी डॉक्टरांनी केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 09:37 IST2020-07-28T09:10:56+5:302020-07-28T09:37:23+5:30

चीनमधील वुहान शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आणि त्यानंतर त्याचा प्रसार जगभर झाला आहे. यामुळे जगभरात दोन लाखांवर मृत्यू झाले असून अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे.
चीनमधील एक मुख्य डॉक्टरांनी कोरोनाबाबत एक मोठा दावा केला आहे. बीबीसी या माध्यमाशी बोलताना डॉक्टर क्वोक युंग युएनने सांगितले की, सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी या आजाराबाबत काही माहिती लपविण्याचा प्रयत्न केला.
कोरोनाच्या संदर्भात सुरुवातीच्या दिवसात माहिती जाणून घेत असताना काही पुरावे नष्ट करण्यात आले होते. तसेच आधी क्लिनिकमधील तपासणीचा वेग देखील कमी होता.
क्वोक युंग युएनने सांगितले, जेव्हा आम्ही वुहानच्या सुपरमार्केटमध्ये गेलो तेव्हा त्या ठिकाणी बघण्यासारखे काहीच नव्हते. मार्केट पहिलेच साफ करण्यात आले होते. तसेच काही पुरावे देखील नष्ट करण्यात आले होते. त्यामुळे आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव नक्की कशामुळे झाला याचा शोध घेण्यास अडचण निर्माण झाली.
चीनमध्ये कोरोना झालेला पहिला रुग्ण १७ नोव्हेंबर २०१९ रोजी आढळला होता. या घटनेनंतर सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत होते. पण या संदर्भात चीनने जागतिक आरोग्य संघटनेला खरी माहिती देणे टाळले होते. रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढल्यावर चीनने टप्प्याटप्प्याने कोरोना संदर्भात थोडी माहिती जाहीर केली.
ही माहिती जाहीर करण्याआधी चीन सरकारने ३ जानेवारीला एक आदेश काढून कोरोनाच्या सुरुवातीला आढळलेल्या अनेक रुग्णांशी संबंधित पुरावे नष्ट करण्यास सांगितले. हे पुरावे नष्ट झाल्यामुळे कोरोनाची सुरुवात कशी झाली याविषयी आता ठोस पुरावे उपलब्ध नाही. मात्र संशोधन तसेच वैद्यकीय निरिक्षणांच्या आधारे केलेले अंदाज यांच्यामुळे कोरोना संकटाबाबत तर्क करणे शक्य आहे.
जगभरातील कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे एक कोटी 39 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. जगभरात मागील 24 तासात नवीन 2.47 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5,714 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 82 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.