काय आहे जमात-ए-इस्लामी, ज्यावर बंदी आणताच बांगलादेश पेटलं; भारताशी कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 08:19 PM2024-08-05T20:19:09+5:302024-08-05T20:23:09+5:30

बांगलादेशात जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. सोमवारी देशव्यापी कर्फ्यूला झुगारत आंदोलनकर्ते अनेक ठिकाणी जमा झाले, आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी सत्ताधारी पक्ष आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष झाला.

मागील काही दिवसांपूर्वी बांगलादेश सरकारनं कट्टरपंथी जमात ए इस्लामी यावर घातलेल्या बंदीमुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक झाले. त्यांनी सरकारी संपत्तीला आग लावली. पंतप्रधान निवासस्थानातही घुसले. इतकेच नाहीतर काही लोकांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता ओळखले जाणारे शेख मुजीब यांच्या मूर्तीवरही हातोडा मारला.

शेख हसीना सरकारने अलीकडेच जमात ए इस्लामी, त्यांची विद्यार्थी शाखा आणि संबंधित सर्व संघटनांवर बंदी आणली होती. बांगलादेशात कित्येक आठवडे सुरू असलेल्या हिंसक आंदोलनानंतर हे पाऊल सरकारने उचलले होते. सरकारच्या या कारवाईविरोधात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेख हसीना यांचा राजीनामा मागत रस्त्यावर उतरले.

दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत जमात-ए-इस्लामीवर बंदी घालताना सरकारने कट्टरवादी पक्षावर आंदोलनाचा फायदा घेत लोकांना हिंसाचारात भडकवल्याचा आरोप केला होता. शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेतृत्वाखालील १४ पक्षांच्या युतीच्या बैठकीत जमात-ए-इस्लामीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मित्रपक्षांनी कट्टरपंथी पक्षावर बंदी घालण्याचे आवाहनही केले होते.

जमात-ए-इस्लामी हा एक राजकीय पक्ष आहे, जो बांगलादेशमध्ये कट्टरवादी मानला जातो. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या समर्थक पक्षांमध्ये या राजकीय पक्षाचा समावेश आहे. जमातवर बंदी घालण्याचा अलीकडचा निर्णय १९७२ मध्ये 'राजकीय हेतूंसाठी धर्माचा गैरवापर' केल्याबद्दल सुरुवातीच्या बंदीनंतर ५० वर्षांनी घेतला आहे.

जमात-ए-इस्लामीची स्थापना १९४१ मध्ये अखंड भारतात ब्रिटिश राजवटीत झाली. २०१८ मध्ये बांगलादेश उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने जमातची नोंदणी रद्द केली होती. यानंतर जमात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरली.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले करण्यात जमात-ए-इस्लामीचेही नाव आहे. मानवाधिकार संघटना ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, जमात-ए-इस्लामी आणि विद्यार्थी शिबिरे हे बांगलादेशातील हिंदूंना सातत्याने लक्ष्य करत आहेत. २०१३ ते २०२२ पर्यंत बांगलादेशमध्ये हिंदूंवर ३६०० हल्ले झाले आहेत असं बांगलादेशात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा अंदाज आहे.

बांगलादेशात सध्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन ढाका सोडलं आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी पत्रकार परिषदेत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू. तोडफोडीपासून दूर राहा. तुम्ही लोक आमच्यासोबत आलात तर आम्ही परिस्थिती बदलू. भांडणे, अराजकता आणि संघर्षापासून दूर राहा. आम्ही आज सर्वपक्षीय नेत्यांशी बोललो आहोत. ते म्हणाले की, बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार स्थापन करेल असं राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी सांगितले.

शेख हसीना या भारतात आल्या असून याठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. बांगलादेशातील परिस्थिती पाहता भारतात सुरक्षेसाठी हायअलर्ट जारी केला आहे. शेख हसीना यांना बांगलादेशातून सुखरुप भारतात आणण्याची जबाबदारी भारतीय सैन्यानं घेतली. संसदेत उद्या बांगलादेशातील परिस्थितीवर भारताची भूमिका परराष्ट्र मंत्री मांडण्याची शक्यता आहे.