what is spy balloon and why are they still in use here is you need to know
'स्पाय बलून' नेमकं आहे तरी काय? ज्यानं अमेरिकेची झोप उडवली अन् कारवाईमुळे चीन संतापला! By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 10:36 AM2023-02-05T10:36:50+5:302023-02-05T10:42:55+5:30Join usJoin usNext अमेरिकन हवाई क्षेत्रात चिनी गुप्तहेर बलूनच्या प्रवेशामुळे खळबळ उडाली होती. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हा बलून आज आकाशातच मारा करुन पाडला. गुप्तचर बलूनमुळे दोन्ही देशांमध्ये नव्या प्रकारचा तणावही निर्माण झाला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आपला चीन दौरा रद्द केला आहे. दुसरीकडे, मुख्यतः हवामान संशोधनासाठी वापरला जाणारा बलून आपली दिशा गमावून अमेरिकेच्या हद्दीत पोहोचला, असे म्हणत चीनने आपला बचाव केला आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ माजवणाऱ्या चीनचा 'गुप्तचर फुगा' म्हणजेच 'स्पाय बलून' नेमका कसा आहे, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. अमेरिकेच्या माहितीनुसार, त्यांनी पाडलेला चिनी गुप्तचर बलून जवळपास तीन स्कूल बसेसच्या आकाराइतका होता. यूएस संरक्षण अधिकार्यांनी सांगितले की, माल्मस्ट्रॉम एअर फोर्स बेसवरील तीन यूएस आण्विक क्षेपणास्त्र सायलो क्षेत्रांपैकी एक असलेल्या मोंटानावर बलून याआधी दिसला होता.गुप्तचर फुगा म्हणजे काय? हेरगिरीसाठी अशाप्रकारच्या बलूनचा वापर करणे ही काही नवीन गोष्ट नाही. १७९४ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान फ्ल्युरसच्या लढाईत ऑस्ट्रियन आणि डच सैन्याविरूद्ध गुप्तचर बलूनचा जगात प्रथम वापर करण्यात आला. या फुग्यात हेलियम वायू भरलेला असतो. जो त्याला खूप उंच उडण्यास मदत करतो. बलूनमध्ये सोलर पॅनलही बसवण्यात आले आहे, ज्यामुळे त्यामध्ये बसवलेल्या उपकरणांना ऊर्जा मिळते. स्पाय बलूनमध्ये हाय रिझोल्युशन कॅमेरे तसेच रडार सेन्सर बसवलेले असतात. याशिवाय फुग्याशी संपर्क साधण्यासाठी संपर्क साधनेही वापरली जातात.ट्रॅक करणे कठीण का आहे? गुप्तचर बलूनचा मागोवा घेणे सोपे नाही. त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे खूप उंचावर उडणे. सामान्यतः पाळत ठेवणारे हे बलून ८०,००० ते १,२०,००० फूट उंचीवर उडतात. फायटर जेटपेक्षा ते उंच उडतात यावरून त्याची उंची मोजता येईल. लढाऊ विमानं साधारणपणे ६५,००० फूट उंचीवर उडतात. तर व्यावसायिक विमानं ४०,००० फूट उंचीवर उडतात.स्पाय बलून का वापरले जातात? कोणत्याही देशाच्या हेरगिरीसाठी असे बलून का वापरले जातात यामागे एक मोठं कारण आहे. हेरगिरीसाठी उपग्रह बनवण्यापेक्षा हे बलून खूपच स्वस्त आहेत. कमी पैशात असा स्पाय बलून तयार केला जातो जो उपग्रहाप्रमाणे काम करतो. गुप्तचर फुगे उपग्रहांपेक्षा कमी उंचीवर उडतात, त्यामुळे ते जास्त काळ आणि कमी उंचीवरून प्रदेशाचे विस्तृत क्षेत्र स्कॅन करण्यास सक्षम असतात. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून चीनच्या याच एका स्पाय बलूनमुळे खळबळ उडाली होती. अखेर आज तो स्पाय बलून अटलांटिक महासागरात पाडण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अमेरिकेच्या हद्दीतील सागरी क्षेत्रात हा चीनी बलून आढळून आला होता. आता कारवाईनंतर बलून समुद्रात कोसळला असून त्याचे अवशेष जमा करण्यासाठी अमेरिकन पथकं घटनास्थळावर पोहोचली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन हवाई क्षेत्रात असलेल्या या बलूनवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात होतं. अमेरिकन सैन्याच्या विमानांकडून बलूनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं गेलं. यातच बायडन यांनी बलून पाडण्याचे आदेश दिले आणि आदेशाचं पालन करत अमेरिकन सैन्यानं कारवाई करत बलूनला समुद्रात यशस्वीरित्या पाडलं आहे. खरंतर बलून आढळून आल्याक्षणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तो पाडण्याचे आदेश दिले होते. पण कारवाई केल्यानंतर बलूनच्या अवशेषांमुळे नागरिकांचं कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून संबंधित बलून सागरी हद्दीत जाण्याची वाट पाहिली गेली. अमेरिकेनं हे बलून दक्षिण कॅरोलिनाच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळपास ९.८ किमी दूरवर अटलांटिक महासागरामध्ये शूट डाऊन केलं आहे. टॅग्स :अमेरिकाचीनUSchina