अखेर पाक झुकलाच, पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला भारताकडून होणार गव्हाची निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 05:02 PM2022-01-29T17:02:48+5:302022-01-29T17:13:13+5:30

अफगाणिस्तानात तालिबान (Afghanistan Taliban) सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

अफगाणिस्तानात तालिबान (Afghanistan Taliban) सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता भारताकडून अफगाणिस्तानला मदत पोहोचवली जाणार आहे.

अफगाणिस्तानसाठी पाकिस्तानमार्गे गव्हाची पहिली खेप पुढील महिन्यात रवाना होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार अनेक महिन्याच्या चर्चेनंतर अफगाणिस्तानसाठी गव्हाची खेप पोहोचवण्यासाठी सहमती देण्यात आली आहे.

अफगाणिस्तानातील जनतेसमोर उभं असलेल्या संकटाकत मानतावादी दृष्टीकोनातून मदत करण्यासाठी भारत प्रयत्नशील होता. ५० हजार टन गहू आणि औषधे पाकिस्तानमार्गे रस्ते वाहतुकीने अफगाणिस्तानला पाठवण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती.

याशिवाय अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर त्या ठिकाणची बिघडलेली परिस्थिती पाहता गेल्या वर्षी पाकिस्ताननं आपल्या भूमी मार्गे अफगाणिस्तानला भारताकडून ५० हजार मेट्रिक टन गहू पाठवण्याची मंजुरी दिली होती.

राजनैतिक सूत्रांनी 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्राला सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये गव्हाची खेप पाठवण्याचं काम सुरू होईल. विहित कार्यपद्धतीनुसार, भारताला पहिल्या खेपाच्या ३० दिवसांच्या आत एकूण गव्हाची वाहतूक करावी लागणार आहे.

तणावपूर्ण संबंध असतानाही दोन्ही देशांनी अफगाणिस्तानवर सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पद्धतींवर सहमती देण्यासाठी दोन्ही बाजूंनी अनेक आठवडे चर्चा केली असल्याचंही सांगण्यात आलं.

सुरुवातीला, पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली मानवतावादी मदतीच्या वस्तू अफगाणिस्तानला त्यांच्या ट्रकमधून पोहोचवायच्या होत्या.

भारतीय किंवा अफगाण ट्रकमधून अन्नधान्य अफगाणिस्तानला पाठवण्याचा प्रस्ताव भारतानं मांडला. नंतर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली की गव्हाची वाहतूक अफगाण ट्रकद्वारे केली जाईल आणि अफगाण कंत्राटदारांची यादी पाकिस्तानला दिली गेली.

परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार अहमद यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, आता सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत आणि पहिली खेप केव्हा पोहोचवली जाईल या तारखेची वाट पाकिस्तान पाहत आहे.

भारताने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला ५० हजार टन गहू आणि जीवनरक्षक औषधे पाकिस्तानच्या भूमीमार्गे अफगाणिस्तानच्या लोकांना पाठवण्यासाठी ट्रान्झिट सुविधेचा प्रस्ताव पाठवला होता आणि त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून याचं उत्तर मिळालं होतं.

शुक्रवारी नवी दिल्ली येथे एका ऑनलाइन मीडिया ब्रीफिंगमध्ये अफगाणिस्तानला मानवतावादी मदतीबद्दल विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती दिली. अफगाणिस्तानला काही वस्तूंचा पुरवठा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अन्नधान्य, कोरोना प्रतिबंधात्मक लसी आणि जीवनावश्यक गोष्टींसह अफगाण लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. सध्या गव्हाची खरेदी व वाहतूक करण्याचे काम सुरू असून त्यासाठी थोडा वेळ लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.