कोरोनाच्या नेमक्या कोणत्या स्टेजवर आहे भारत? WHO नं केलं स्पष्ट, भारतीयांचं केलं कौतुक! वाचा... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 09:20 AM 2021-08-25T09:20:56+5:30 2021-08-25T09:23:45+5:30
Corona Updates: जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. यात भारत नेमकं कोणत्या स्टेजला आहे याबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. Soumya Swaminathan) यांनी भारतात कोरोना संक्रमणाची नेमकी कोणती स्थिती आहे याची माहिती दिली.
भारतात कोरोना संक्रमण अत्यल्प आणि मध्यम स्तरावर आहे. अशी स्थिती तेव्हाच निर्माण होते जेव्हा देशातील लोकसंख्या कोरोना विषाषूसोबत जगणं शिकलेली असते. कोरोना संक्रमाणाचा हा टप्पा अतिशय वेगळा असतो, असं WHO कडून स्पष्ट करण्यात आली आहे.
WHO चा टेक्निकल ग्रूप अधिकृत लसींमध्ये कोव्हॅक्सीनचाही समावेश करुन घेण्यासाठी लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करुन लसीला जागतिक मंजुरी देईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सीनला जागतिक मान्यता मिळू शकते. स्वामीनाथन यांच्या मतानुसार भारताची प्राकृतिक रचना आणि देशातील विविध ठिकाणी असलेली लोकसंख्येची घनता व इम्युनिटीची स्थिती पाहता नागरिक आता कोरोनासोबत जगायला शिकले आहेत असं म्हणता येईल.
देशात विविध ठिकाणी व्हायरस प्रादुर्भावाच्या प्रमाणात उतार-चढाव पाहायला मिळू शकतो. भारत सध्या कोरोना व्हायरसच्या स्थानिकतेच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. यात कोरोना प्रादुर्भावाची स्थिती अल्प आणि मध्यम स्तरावर आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी गाठलेलं संक्रमणाचं शिखर आणि प्रादुर्भावाची वाढ होताना आता दिसत नाही, असंही स्वामीनाथन म्हणाल्या आहेत.
२०२२ सालाच्या अखेरपर्यंत देशातील ७० टक्के नागरिकांचं कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेलं असेल आणि त्यावेळी देशातील परिस्थिती पूर्ववत झालेली असेल अशी आशा आहे, असंही त्या म्हणाल्या.
लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या शक्यतेबाबत पालकांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. आम्ही सीरी सर्व्हेक्षण पाहिलं आहे आणि इतर देशांकडून बरंच काही शिकायला मिळालं आहे. त्यातून लहान मुलांना लागण होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. पण त्याचं प्रमाण अतिशय सौम्य असल्याचं दिसून आलं आहे.
लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचं प्रमाण हे जास्त असणार नाही असंच सध्याच्या स्थितीवरुन दिसून येत आहे. लहान मुलांना लागण झालीच तरी त्यांना सौम्य लक्षणं दिसून येतील आणि त्यावर मात करता येईल असंही त्या म्हणाल्या आहेत.