काय सांगता! कोरोनाचा फैलाव वुहानमधून नाही; WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 11:35 AM2021-03-13T11:35:26+5:302021-03-13T11:41:00+5:30

चीनमधून परतलेल्या WHO च्या शास्त्रज्ञांनी अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. WHO च्या चार शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग चीनच्या वुहान शहरातून झालेला नाही. वुहानमध्ये तसे पुरावे आढळून आलेले नाहीत. (who four scientist claims that no evidence of corona origin was founded from Wuhan lab)

वुहान: सन २०१९ मध्ये कोरोनाचा कहर संपूर्ण जगाने पाहिला. जागतिक स्तरावरील एकही देश असा नाही, जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला नाही. कोरोना संसर्ग विषाणूचा फैलाव चीनच्या वुहान शहरातून झाला, असे सांगितले जात होते.

कोरोना संसर्गाचा प्रसार अन्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये अत्यल्प झाल्याने यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली असताना चीनमध्ये त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसून आल्याने संपूर्ण जगात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसाराची कारणे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांचे एक पथक चीनमधील वुहान शहरात तपासणी करण्यासाठी गेले होते. या पथकाने आपल्या प्राथमिक अंदाजात अतिशय धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

चीनमधून परतलेल्या WHO च्या शास्त्रज्ञांनी अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. WHO च्या चार शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग चीनच्या वुहान शहरातून झालेला नाही. वुहानमध्ये तसे पुरावे आढळून आलेले नाहीत. (who four scientist claims that no evidence of corona origin was founded from wuhan lab)

चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार झालेला नाही. कोरोनाची उत्पत्ती आणि त्याचा प्रसार याचे सर्वांत महत्त्वाचे आणि मोठे कारण म्हणजे वन्यजीवांचा व्यापार असल्याचा दावा WHO च्या या चार शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरोनाची एक लिंक वुहानमधील मांस बाजार आणि दक्षिण चीनच्या काही क्षेत्रातून मिळाली आहे, असेही WHO च्या या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सर्वांत प्रथम याच बाजारात कोरोना विषाणू संसर्ग पसरला होता. तर दक्षिण चीनच्या शेजारील क्षेत्रांमध्ये कोरोनाची लागण झालेले वटवाघूळ आढळून आले होते.

मानव, पशू आणि पर्यावरणीय आरोग्य या विषयावर संशोधन करणाऱ्या इकोहेल्थ अलायन्स या संस्थेचे अध्यक्ष डॉ. पीटर दजाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वुहानमध्ये दक्षिण चीनच्या शेजारील क्षेत्रातून आलेली एक पाइपलाइन होती. याच भागात कोरोनाची लागण झालेली वटवाघुळे आढळून आली होती. पाळीव आणि शेतीशी निगडीत जनावरांपासून विषाणू वाढला आणि वन्यजीव व्यापारामुळे वुहान येथे पोहोचला, असा दावा त्यांनी केला आहे.

डॉ. दजाक WHO कडून पाठवण्यात आलेल्या पथकातील एक सदस्य आहेत. त्यांच्यासह प्रोफेसर डेविड हेयमॅन, प्रोफेसर मॅरियन कोपामन्स आणि प्रोफेसर जॉन वॉटसन यांचाही समावेश या पथकात होता. दरम्यान, वुहान शहरात कोरोनाचा प्रसार डिसेंबरमध्ये सुरू झाला, असे सांगितले जात होते.

कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधील वुहान शहरातून प्रथम झाल्याचे समोर आल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर WHO च्या तज्ज्ञांच्या पथकाला चीनने तपासणी करण्याची परवानगी दिली. वुहानमध्ये कोरोनाचे १३ प्रकार आढळून आले असून, प्राथमिक अंदाजापेक्षा ५०० टक्क्यांहून अधिक विध्वंस झाला, असा दावा WHO कडून करण्यात आला होता.

चीनच्या सरकारी कागदपत्रांनुसार चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १७ नोव्हेंबर २०१९ रोजी आढळला होता. डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण होते, अशी माहिती यूनिवर्सिटी ऑफ सिडनीचे व्हायरॉलॉजिस्ट एडवर्ड होम्स यांनी दिली.