Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत... By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 04:44 PM 2024-10-18T16:44:20+5:30 2024-10-18T16:59:10+5:30
Yahya Sinwar Death : काही प्रमुख उमेदवारांची नावे समोर आली आहेत. ज्यामधील एक हमासचा प्रमुख नेता होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात हमासचा नेता याह्या सिनवार याची इस्रायलकडून हत्या करण्यात आल्यानंतर हमासचा पुढील प्रमुख नेता कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सिनवार याच्या निधनाने हमासचे मोठे नुकसान झाले असून आता संघटनेत नवीन नेता नेमण्याची प्रक्रिया महत्त्वाची बनली आहे. काही प्रमुख उमेदवारांची नावे समोर आली आहेत. ज्यामधील एक हमासचा प्रमुख नेता होऊ शकतो.
खालेद मशाल : खालेद मशाल हा हमासचा माजी नेता आहे. २००६ पासून एका दशकाहून अधिक काळ त्याने नेतृत्व केले होते. दरम्यान, खालेद मशालला पुन्हा नेता बनणे कठीण मानले जात आहे, कारण त्याने सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्याविरोधात बंडखोरीला पाठिंबा दिला होता. ज्यामुळे खालेद मशाल आणि इराणमध्ये मतभेद झाले होते.
खलील अल-हय्या: हमासच्या कतार-आधारित राजकीय ब्युरोचे सदस्य खलील अल-हय्या हा हमासच्या वतीने इस्रायलशी शांतता चर्चेसाठी प्रमुख वार्ताहर आहे. हमासचा माजी नेता इस्माईल हानिया याचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणूनही त्याचा विचार केला जात होता, परंतु नंतर सिनवार याला हे पद मिळाले.
महमूद अल-जहर : महमूद अल-जहर हा हमासच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. संघटनेतील प्रमुख नेता मानला जातो. पुराणमतवादी आणि मूलतत्त्ववादी विचारसरणी असलेला नेता म्हणून त्याची ओळख आहे. याआधी, अल-जहर पॅलेस्टिनी विधान परिषदेचे सदस्य आणि हमास सरकारचा पहिला परराष्ट्र मंत्री होता. १९९२ आणि २००३ मध्ये इस्रायलनं त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण तो वाचला.
मोहम्मद सिनवार: मोहम्मद सिनवार हा याह्या सिनवारचा भाऊ आहे. त्यामुळे त्याच्याकडे मजबूत वारसदार म्हणून पाहिले जाऊ शकते. भावाप्रमाणेच त्याचीही कट्टरतावादी विचारसरणी आहे. तो नेता झाल्यास हमासच्या धोरणांमध्ये फारसा बदल होणार नाही, अशी शक्यता आहे. मोहम्मद सिनवार याला हमासचा नवा नेता बनवल्यास इस्रायल आणि हमासमधील शांतता चर्चेची शक्यता कमी होईल, त्यामुळे युद्ध थांबण्यास वेळ लागू शकतो, असे म्हटले जात आहे.
मुसा अबू मारझोर्क: मुसा अबू मारझोर्क हा हमासच्या सर्वोच्च राजकीय ब्युरोचा सदस्य आहे. तो हमासच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. ९० च्या दशकात त्याच्यावर दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी पुरवल्याचा आरोप होता, त्यानंतर त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याला जॉर्डनला पाठवण्यात आले. हमासचा पुढचा नेता म्हणूनही मुसाचे नाव पुढे येत आहे.
दरम्यान, या प्रमुख उमेदवारांपैकी, जो कोणी हमासचा पुढचा नेता होईल. त्यानुसार हमास संघटनेच्या भविष्यावर आणि गाझामधील शांतता प्रक्रियेवर खोलवर परिणाम होईल. याह्या सिनवार याच्या मृत्यूनंतर युद्धाची दिशा आणि हमासच्या धोरणांमध्ये बदल होऊ शकतो, परंतु हमासचा नवा नेता म्हणून कोण उदयास येतो, यावर ते अवलंबून असणार आहे.