बापरे! 11 कोटींचा मासा, का म्हटलं जातं काळं सोनं? तुम्हालाही होईल खाण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:56 IST2025-01-06T19:49:57+5:302025-01-06T19:56:36+5:30
Bluefin Tuna fish: एका माशाचा लिलाव झाला... बोली लागली आणि मासा विकला गेला तब्बल ११ कोटी रुपयांना! त्यामुळेच हा मासा इतका महाग कसा अशी चर्चा सुरू झालीये.

घरी मासे आणायचे म्हटलं तर एखादा व्यक्ती किती पैसे खर्च करेल. ५००, १०००... फारतर २०००. पण तुम्ही कधी ऐकलंय का की एक मासा ११ कोटी रुपयांना विकला गेला? हो, मासळी बाजारातील लिलावात एक मासा ११ कोटींना विकला गेला. त्या माशाचं नाव आहे ब्लूफिन ट्यूना! (bluefin tuna fish)
जापानची राजधानी टोक्यामध्ये एक प्रसिद्ध सुशी रेस्तराँ आहे, तिथे ही बोली लावण्यात आली. बाईकच्या आकाराचा हा मासा ११ कोटींना खरेदी केला गेला. टोक्योमध्ये दरवर्षी मासे लिलाव होतो.
मागील 5 वर्षांपासून Onodera नावाचा एक ग्रुप आहे, जो सर्वाधिक बोली लावतो. यावर्षीही त्यांनीच सर्वाधिक बोली लावली. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, Onodera ग्रुपशी संबंधित शिंजी नागाओ यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
"हा 2025 चा पहिला लिलाव होता. वर्षातील पहिल्या ब्लूफिन ट्यूना मासा आनंदी आणि चांगलं नशीब घेऊन येतो. आमची इच्छा असते की, लोकांनी तो खावा आणि वर्षांची सुरुवात आनंदात करावी."
आता ब्लूफिन ट्युना हा मासा इतका महाग कसा असाही प्रश्न तुम्हाला पडलाच असेल? त्याचीही कारणे आहेत. एक म्हणजे हा मासा जवळपास ४० वर्षे जगतो. समुद्राच्या तळाशी जाण्याची क्षमता या माशाला इतर माशांपासून वेगळं ठरवते.
इतकी किंमत असण्याचं दुसरं कारण म्हणजे याचा आकार. त्याचा आकार खूप मोठा असतो. मोठा मासा असल्याने त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खास साहित्याची गरज पडते. त्यांच्या क्वालिटी चांगली राहावी म्हणून त्याला खूप चांगल्या पद्धतीने ठेवावं लागतं, त्यामुळेही त्याची किंमत वाढते.
आणखी एक आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा. म्हणजे असं की, ब्लूफिन ट्युना मासा जगभरातील सर्व मोठ्या आणि प्रसिद्ध रेस्तराँमध्ये बनवला जातो. पण, त्यांचा पुरवठा कमी असतो. जापानमध्ये Tsugaru Strait भागात Oma नावाचे ठिकाण आहे. इथे मिळणारा ब्लूफिन ट्युना सर्वात महाग विकला जातो. याच्या किंमतीमुळे त्याला काळं सोनं असं म्हटलं जातं.