बेडकांची घटती संख्या मानवासाठी का बनतोय धोका? याचं कारण नक्कीच विचार करायला भाग पाडेल, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:15 PM2022-09-24T16:15:18+5:302022-09-24T16:23:35+5:30

जगभरात बेडकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण याचा मानवावर कसा काय परिणाम होऊ शकतो असा विचार करत असाल तर जर थांबा. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बेडूक मानवांसाठी खूप महत्वाचे आहेत. यामागची कारणं एकदा जाणून घेतली की सारं लक्षात येतं...

जगभरात बेडकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. माणसाला निरोगी राहायचे असेल आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर बेडकांची उपस्थिती आवश्यक आहे. शास्त्रज्ञांनीही आपल्या संशोधनातून हे सिद्ध केलं आहे. बेडूक माणसांसाठी किती महत्त्वाचे आहेत ते जाणून घेऊयात..

एन्व्हायर्नमेंट रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 80 च्या दशकात पनामा आणि कोस्टा रिकामध्ये पाणी आणि जमिनीवर राहणाऱ्या उभयचरांची संख्या कमी झाली होती. यामध्ये बेडूक आणि सॅलॅमंडरचाही समावेश होता. या सर्वांना व्हायरल फंगल इन्फेक्शन झालं होतं. त्यांची संख्या झपाट्यानं कमी होत होती. सुरुवातीच्या काळात शास्त्रज्ञांना संशोधनही नीट करता आलं नाही.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार बेडूक आणि सॅलमँडर डासांची संख्या वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात. ते पाण्यात असलेल्या डासांच्या अळ्या खातात. हे त्यांचे आवडतं खाद्य आहे. अशा प्रकारे ते मलेरिया, चिकनगुनिया आणि डेंग्यू यांसारख्या डासांमुळे पसरणारे रोग रोखण्याचं काम करतात. संशोधनातही हे सिद्ध झालं आहे. आता हे कसं सिद्ध झालं ते समजून घेऊयात.

संशोधकांच्या मते कोस्टा रिका आणि पनामामध्ये बुरशीजन्य प्रभाव वाढल्यानं बेडकांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर मानवांमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी एक हजार लोकांमध्ये सरासरी १.५ टक्के लोकांना मलेरियाची लागण होत होती, ती वाढून २ टक्के झाली आहे. इतकंच नाही तर अशा घटनांमुळे मध्य अमेरिकेत मलेरियाच्या रुग्णांमध्ये ७० ते ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बेडकांचे नामशेष होणे मानवासाठी धोकादायक का आहे हे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरून समजू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी ७ लाख २५ हजार मृत्यू होतात. ज्यामध्ये ६ लाख मृत्यू एकट्या मलेरियामुळे होतात.

मलेरियाच्या अळ्या आणि मच्छर हे बेडकांचं खाद्य आहे. जर बेडकांचीच संख्या जगभरातून कमी होऊ लागली तर याचा विपरीत परिणाम नैसर्गिक साखळीवर होईल. याच नैसर्गिक साखळीत मानवाचाही सहभाग आहे हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे निसर्गातील कोणतीही गोष्टीचा मानवाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडली गेलेली आहे.

टॅग्स :आरोग्यHealth