चिलीत वणवा पेटला! ११२ जणांचा मृत्यू, हजारो घर-संसार बेचिराख, अग्नितांडवाचे भयावह फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:49 PM 2024-02-05T13:49:36+5:30 2024-02-05T13:56:48+5:30
Chile Wildfires: मध्य चिलीमध्ये लागलेल्या भीषण वणव्यामध्ये आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ ककत आहेत. चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे, असा इशारा दिला आहे. मध्य चिलीमध्ये लागलेल्या भीषण वणव्यामध्ये आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ ककत आहेत. चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे, असा इशारा दिला आहे.
या अग्नितांडवानंतर शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय १ हजारांहून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. हजारो गाड्यांची राखरांगोळी झाली आहे. विना डेल मार आणि वलपाइसो या भागांना या अग्नितांडवाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हे दोन्ही परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.
या दोन्ही शहरांमध्ये मिळून सुमारे १० लाख एवढी लोकवस्ती आहे. येथे वारे वेगाने वाहत आहेत. त्यामुळे आग वेगाने पसरली. सध्या या किनारी भागात भयंकर उन्हाळा पडत असून, लोक सुरक्षित राहण्यासाठी इकडे-तिकडे पळत आहेत.
वणव्याचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागात बचावकार्य सुरळीत करता यावे यासाठी प्रशासनाने संचारबंदी लावली आहे. लष्कर, अग्निशमन दलाची हेलिकॉप्टर्स वणवा शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
संपूर्ण चिलीमध्ये या क्षणी १६५ ठिकाणी आग लागलेली आहे. तसेच विना डेल मार आणि क्लिपे परिसरात १४ हजार घरांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्नितांडवानंतर जे लोक आपली घरं पाहायला गेले, त्यांना त्यांची घरं ओळखता येत नव्हती. त्यांचे संसार या वणव्यात बेचिराख झाले आहेत.
६१ वर्षांच्या सुआरेझ त्यांच्या घरातून काही प्लेट आणि पोर्सिलीनपासून तयार केलेली एक बाहुलीच बाहेर काढू शकले. आता जळालेल्या घरात त्या जुने दागिने शोधत आहेत.
दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळ्यात जंगलांमध्ये वणवे पेटत असतात. मात्र चिलीमध्ये लागलेला वणवा हा २०१० मध्ये झालेल्या भूकंपानंतरची सर्वात मोठी आपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिलीच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकसान झालेल्या भागात अधिकाधिक मदत पोहोचवता यावी यासाठी जगभरातून मदतीचं आवाहन केलं आहे. दरम्यान, २०० लोक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत वणव्यामुळे ८ हजार हेक्टरवरील जंगल आणि शहराचा भाग जळून खाक ढाससा आहे. लोकांना सरकारी शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे.
चिलीमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून अल निनोमुळे हवामान खूप उष्ण राहत आहे. तसेच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.तापमान वाढत आहे. तसेच जंगलात लागलेल्या वणव्यांचं कारण हे वाढतं तापमान असल्याचं सांगितलं जात आहे.