Omicron: ओमायक्रॉनचा मुक्काम लांबणार? जेवढा पसरणार तेवढा नव्या विषाणूंचा जन्म होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 10:38 AM2022-01-06T10:38:49+5:302022-01-06T10:42:07+5:30

Omicron Corona Virus, WHO: तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन फारसा गंभीर नाही. तर काहींच्या मते, प्रसंगी तो प्राणघातकही ठरू शकतो. पण डब्ल्यूएचओचे म्हणणे वेगळेच आहे.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा मुक्काम लांबणार असल्याचे सूचित होत आहे. ओमायक्रॉन जेवढ्या वेगाने पसरेल तेवढ्याच मोठ्या प्रमाणात नवीन व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

याविषयी तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन फारसा गंभीर नाही. तर काहींच्या मते, प्रसंगी तो प्राणघातकही ठरू शकतो.

डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन कमी घातक असल्याच्या मुद्द्यावर तज्ज्ञांचे एकमत आहे. ओमायक्रॉन जितक्या अधिक प्रमाणात पसरेल नवा व्हेरिएंट येण्याची शक्यता तेवढीच बळावेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओमायक्रॉनचा संसर्गाचा वेग अधिक आहे. युरोपात संसर्गात वाढ झाली असून आतापर्यंत १० कोटी बाधित आढळले आहेत. ओमायक्रॉन अधिक काळ टिकणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओमायक्रॉनचा संसर्गाचा वेग मोठा असला तरी रुग्णालयात भरती व्हावे लागणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. परंतु संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने ओमायक्रॉन व्हेरिएंट चिंतेचा बाब झाला आहे.

सध्या हा व्हेरिएंट जगभरात पसरला असून मृत्यूदर कमी आहे. मात्र, तरीही लोकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

भारतात डेल्टा व्हेरिएंटचा खूप मोठा फटका बसला असल्याने भारतीयांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनानियमांचे काटेकोर नियम पाळणे आणि बूस्टर डोससाठी सरकारांनी आग्रही राहणे अधिक योग्य ठरेल.