CoronaVirus : '53 देशांमध्ये कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका, 5 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू'; WHOनं व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 11:04 PM2021-11-04T23:04:26+5:302021-11-04T23:08:36+5:30

क्लेज म्हणाले, हिच स्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत या भागांत पाच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. अशातच तब्बल 53 देशांच्या मोठ्या भागांत कोरोनाची नवी लाट येण्याची भीती WHO च्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. होय, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख डॉ. हैन्स क्लेज यांनी गुरुवारी यासंदर्भात भाष्य केले.

डॉ. हैंस क्लेज यांनी म्हटले आहे, की कोरोना बाधितांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे आणि प्रदेशात कोरोना संसर्गही वेगाने पसरत आहे. हे चिंताजनक आहे. असेच सुरू राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

युरोप आणि मध्य आशियातील 53 देशांच्या भागांत कोरोना विषाणूची आणखी एका लाट येण्याचा धोका आहे अथवा ते आधीपासूनच महामारीच्या नव्या लाटेचा सामना करत आहेत.

क्लेज डेनमार्कच्या कोपनहेगनमधील संघटनेच्या यूरोप मुख्यालयात पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, 'आपण साथीच्या रोगाच्या उद्रेकाच्या एका गंभीर टप्प्यावर उभे आहोत. युरोप पुन्हा एकदा महामारीच्या केंद्रस्थानी आहे, जेथे आपण एक वर्षापूर्वी होतो. यात फरक केवळ एवढाच, की आता आरोग्य अधिकार्‍यांना व्हायरसबद्दल अधिक माहिती आहे आणि त्यांच्याकडे त्याच्याशी लढण्यासाठी चांगली साधनेही आहेत.'

क्लेज म्हणाले, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय आणि काही भागांत लसीकरणाचे कमी प्रकरण यावरून कोरोना रुग्ण संख्या का वाढत आहे, हे स्पष्ट होते. तेसेच गेल्या एका आठवड्यात ५३ देशांच्या भागांत कोविडमुळे रूग्णालयात दाखल होण्याऱ्यांचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे.

क्लेज म्हणाले, हिच स्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत या भागांत पाच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

संघटनेच्या युरोप कार्यालयाने म्हटले आहे, की या प्रदेशांत आठवडाभरात जवळपास 18 लाख रुग्ण समोर आले आहेत. यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. तर साप्ताहिक मृत्यू 24,000 होते, यात 12 टक्के वाढ झाली आहे.

Read in English