World War 2: युद्ध थांबले, देशाने सरेंडर केले, पण तो मात्र २९ वर्षे शत्रूविरोधात लढत राहिला, अखेर... By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:19 AM 2022-09-19T11:19:55+5:30 2022-09-19T11:32:41+5:30
World War 2: आज आम्ही तुम्हाला एका अशा मिलिट्री कमांडरविषयी सांगणार आहोत. जो युद्ध संपल्यानंतर तब्बल २९ वर्षे आघाडीवर लढत राहिला. तसेच आपल्या शत्रूची हानी करत राहिला. त्यामुळे तो जिवंतपणीच एक दंतकथा बनला. या सैनिकाचं नाव आहे. हीरू ओनीडा. आज आम्ही तुम्हाला एका अशा मिलिट्री कमांडरविषयी सांगणार आहोत. जो युद्ध संपल्यानंतर तब्बल २९ वर्षे आघाडीवर लढत राहिला. तसेच आपल्या शत्रूची हानी करत राहिला. त्यामुळे तो जिवंतपणीच एक दंतकथा बनला. या सैनिकाचं नाव आहे. हीरू ओनीडा.
१९४४ मध्ये दुसरे महायुद्ध निर्णायक स्थिती असताना अमेरिकेने जपानला गुडघे टेकण्यास भाग पाडण्यासाठी तीव्र कारवाई सुरू केली होती. त्यावेळी जपानच्या इम्पिरियल आर्मीमधील सेकंड लेफ्टनंट हीरू ओनीडा यांना फिलिपिन्समधील लुबांग बेटावर पाठवण्यात आले. तसेच शक्य असेल तेवढा अमेरिकेच्या सैन्याला प्रतिकार करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशानंतर हीरू ओनिडा आत्मघाती मोहिमेवर निघाले. दरम्यान, अमेरिकी सैन्याने लुबांग बेटावर सर्वशक्तीनिशी हल्ला करून फेब्रुवारी १९४५ रोजी या बेटावर कब्जा केला. या हल्लात अनेक जपानी सैनिक मारले गेले. तर काहीजणांनी सरेंडर केले.
मात्र सेकंड लेफ्टिनंट हीरू ओनीडा आणि त्यांचे तीन सहकारी जंगलातच लपून राहिले. त्यांनी अमेरिकी सैन्याला मदत करणारे स्थानिक सैनिक आणि अमेरिकी सैन्याविरोधात लढा सुरू ठेवला. यादरम्यान, अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि जपानला शरणागती पत्करायला भाग पाडत युद्धात निर्णायक विजय मिळवला.
मात्र जपानपासून हजारो मैल अंतरावर पॅसिफिक महासागरातील बेटांवर लढत असलेल्या जपानी सैनिकांना युद्ध संपल्याची माहिती मिळालीच नव्हती. ते पूर्वीप्रमाणेच लढत होते. अमेरिकी सैन्याने जपानी सैन्य आणि सरकारच्या मदतीने फिलिपिन्सच्या जंगलामध्ये पत्रके टाकली. त्यातून युद्ध संपले असून, सैनिकांनी घरी परतावे, असे आवाहन केले.
इतर सैनिकांप्रमाणेच हीरू ओनिडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही ही पत्रके वाचली मात्र ही अमेरिकी सैन्याची कुठली तरी चाल असावी, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी लढा सुरूच ठेवला.
पाच वर्षे लोटली. अमेरिकी सैन्य माघारी परतले. लुबांगमधील स्थानिक दैनंदिन कामात लागले. मात्र ओनिडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा लढा सुरूच राहिला. जो दिसेल त्याच्यावर ते हल्ला करायचे. त्यामुळे स्थानिक त्रस्त झाले. फिलिपिन्स सरकारने पुन्हा जंगलामध्ये पत्रके टाकली. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही.
१९५२ मध्ये जपानी सरकारने शेवटचा प्रयत्न म्हणून बेपत्ता सैनिकांच्या शोधासाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो आणि संदेश वाटले. तसेच जपानच्या सम्राटांचा एक संदेशही पाठवला. मात्र हीरू ओनिडा यांनी पुन्हा एकदा हे आवाहन धुडकावून लावले.
दरम्यान, जंगलात दहशत निर्माण करणाऱ्या या सैनिकांचा सामना करण्यासाठी स्थानिकांनी शस्त्र हाती घेतले. दरम्यान, १९५९ पर्यंत हीरू ओनीडा यांचा एक सहकारी मारला गेला, तर एकाने आत्मसमर्पण केले. त्यांचा शेवटचा सहकारी कोजुका पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला.
मात्र ओनीडा यांनी लढा सुरूच ठेवला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर २५ वर्षे त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. त्यांनी आपलं अर्ध्याहून अधिक जीवन लुबांगच्या जंगलात घालवले. एकटा पडूनही त्यांनी लढा सुरूच ठेवला. युद्धानंतर २५ वर्षे लढत असलेल्या सैनिकाबाबत कळल्यावर जपानी लोकांना त्याच्यामध्ये हीरो दिसू लागला.
जपानी सरकारने पुन्हा एकदा त्याचा शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. अखेरीच जपानमधील एक साहसी तरुण नोरिओ सुजुकी याने फिलिपिन्सच्या जंगलात अथक शोध घेऊन हीरू ओनिडाचा शोध घेतला. त्याने ओनीडा यांना त्यांच्याबाबत जपानी लोकांच्या भावना सांगितल्या. मात्र ओनीडा सरेंडर करण्यास तयार नव्हते.
अखेरीस ओनीडा यांचा आदेश देणाऱ्या तत्कालीन कमांडरांना जंगलात पाठवण्यात आले. त्यांनी आदेश देताच ओनीडा यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर फिलिपिन्स सरकारने युद्धबंद्यांसंबंधीच्या कायद्यानुसार त्याला माफ केले.
हीरू ओनीडा युद्ध संपल्यानंतर २९ वर्षांनी १९७४ मध्ये माघारी परतले. ते माघारी परतले तेव्हा त्यांचं वय ५२ वर्षे होतं. संपूर्ण जपानने त्यांचं स्वागत केलं. त्यांनी नंतरच्या काळात या अनुभवावर युद्ध लिहिलं. २०१४ मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी ओनिडा यांचं निधन झालं.