जगातील सर्वात मोठे दानवीर, ज्यांनी कोरोनाच्या संकटात मदतीसाठी उघडला खजिना, या भारतीयांचाही आहे समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 19:55 IST2020-06-15T19:36:12+5:302020-06-15T19:55:37+5:30
या संकटकाळातही जगात असेही दानवीर आहेत ज्यांनी जगावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली तिजोरी उघडून भरभरून दान दिले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगाला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. जगभरातील मोठ्या उद्योगपतींनाही या संकटामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र या संकटकाळातही जगात असेही दानवीर आहेत ज्यांनी जगावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली तिजोरी उघडून भरभरून दान दिले आहे.
जॅक डोर्सी
ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी कोरोनाच्या संकटकाळात मदत आणि इतर कामांसाठी १०० कोटी अमेरिकन डॉलर मदतीची घोषणा केली आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीच्या २१.७४ टक्के इतकी आहे.
बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स, अमेरिका
अनेक वर्षांपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मान मिळवणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी ३०.५ कोटी डॉलर संपत्तीचे दान केले आहे. ही रक्कम रुग्णांवर उपचार आणि कोरोनावर लस शोधण्यासाठी होणाऱ्या संशोधनावर खर्च होणार आहे.
अझीम प्रेमजी, भारत
भारतीय उद्योजक अझीम प्रेमजी यांनी या संकटकाळात १३.२ कोटी डॉलर एवढी रक्कम दान केली आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीच्या २१.७४ टक्के आहे.
जॉर्ज सोरोस, अमेरिका
सर्वाधिक धोक्याचा सामना करणारी लोकसंख्या आणि अल्प उत्पन्नगटातील मजुरांच्या मदतीसाठी जॉर्ज सोरोस यांनी १३ कोटी डॉलर एवढी रक्कम दान केली आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीच्या एकूण १.५७ टक्के आहे.
अँड्र्यू फॉरेस्ट, ऑस्ट्रेलिया
अॉस्ट्रेलियाचे अँड्र्यू फॉरेस्ट यांनी औषध पुरवठा आणि इतर वैद्यकीय कामांसाठी दहा कोटी डॉलरची मदत केली आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीच्या १.६४ टक्के आहे.
जेफ स्कॉल, अमेरिका
कोरोनाच्या संकटकाळात उपासमारीचा सामना करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी जेफ स्कॉल यांनी १० कोटी डॉलरपेक्षा जास्त रक्कम दान केली आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीच्या सुमारे १.९२ टक्के आहे.
जेफ बेजोस, अमेरिका
अँमेझॉनचे प्रमुख जेफ बेजेस यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होतो. त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात लोकांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी १० कोटी डॉलरचे दान दिले आहे.
मायकेल डेल ऑस्टिन, अमेरिका
अमेरिकी व्यावसायिक असलेल्या मायकेल डेल अॉस्टिन यांनी कोरोनावरील लसीच्या संशोधनासाठी आणि कोरोनाविरोधातील लढातील अन्य कामांसाठी १० कोटी डॉलर एवढ्या रकमेचे दान दिले आहे.
मायकेल ब्लूमबर्ग
विकसनशील देशांमध्ये मदत करण्यासाठी अन्य उपाययोजनांसाठी ब्लूमबर्ग यांनी ७.४५ कोटी डॉलरपेक्षा अधिक रक्कम दान केली आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीच्या ०.११ टक्के इतकी आहे.
अमासीयो ओर्टेगा, स्पेन
जारा या फँशन ब्रँडचे मालक अमासियो यांनी वैद्यकीय औषधांचा पुरवठा आणि उपकरणांच्या खरेदीसाठी ६.८ कोटी डॉलर संपत्तीचे दान दिले आहे. ही रक्कम त्याच्या एकूण संपत्तीच्या ०.११ टक्के एवढी आहे.