येथे घटस्फोटापूर्वी नवरा-बायकोला द्यावी लागते परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 11:51 AM2019-02-06T11:51:34+5:302019-02-06T11:56:59+5:30

चीनमध्ये घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. घटस्फोटाचा हा ट्रेड कमी व्हावा, यासाठी येथील सरकार प्रयत्न करत आहे. घटस्फोटाचे प्रमाण रोखण्यासाठी येथे पती आणि पत्नीला घटस्फोट घेण्यापूर्वी चक्क परीक्षा द्यावी लागते.

रिकाम्या जागा भरा, प्रश्नांची थोडक्यात-संक्षिप्त उत्तरे द्या, अशा स्वरुपाची प्रश्नपत्रिका असते. प्रश्नपत्रिकेत लग्नाची तारीख, पत्नीच्या वाढदिवसाची तारीख यांसारखे प्रश्न विचारले जातात. शिवाय, तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत का?, असे प्रश्नही विचारले जातात.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेत 15 प्रश्न विचारले जातात. उत्तर पत्रिका तपासल्यानंतर 60 हून अधिक गुण मिळाल्यास पती-पत्नीला घटस्फोट घेण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला लोकल अथॉरिटीकडून दिला जातो.

वर्ष 2017 पूर्वी 6 महिन्यांमध्ये जवळपास 20 लाख घटस्फोट झाले होते. बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार चिंतेत आहे.

आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्यामुळे घटस्फोट घेत असल्याचे कारण अनेक जोडप्यांनी दिले. तर 15 टक्के प्रकरणांमध्ये घरगुती हिंसा हे प्रमुख कारण होते.

पण, घटस्फोट मिळण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमुळे जोडप्यांना केवळ सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करुन दिली जात नाही, तर अथॉरिटीच्या सल्ल्यामुळे त्यांचा संसारही तुटण्यापासून वाचतो, असे अथॉरिटीने म्हटले.

पण, सोशल मीडियावर नागरिकांनी या परीक्षेसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. कारण एखाद्याला लग्नाची तारीख लक्षात असल्यास, त्यांच्या नात्यात सारं काही आलबेल आहे, असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत अनेकांनी नोंदवले आहे.