जगातली सर्वात लांब आणि लक्झरी कार, ज्यात स्वीमिंग पूलपासून ते हेलिपॅडची आहे सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:30 PM2021-10-26T15:30:41+5:302021-10-26T15:42:15+5:30

अमेरिकन ड्रीम ही कार आधी भाड्याच्या टॅक्सीच्या रूपात चालवली जात होती. त्यावेळी याचं भाडं ५० ते २०० यूएस डॉलर प्रति तास होतं.

आतापर्यंत तुम्ही जगातली सर्वात लांब नदी, जगातली सर्वात उंच बिल्डींग, जगातला सर्वात उंच शिखर आणि जगातले सर्वात उंच मनुष्याला पाहिलं असेल. पण तुम्ही कधी जगातल्या सर्वात लांब कारबाबत ऐकलं का? नाही ना! तर आज आम्ही तुम्हाला या खास कारबाबत सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला सांगतोय एका अशा कारबाबत जिच्या नावावर जगातल्या सर्वात लांब कारचा वर्ल्ड रेकॉर्डही आहे. या कारचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. ही कार अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या जे. ओहरबर्गने १९८६ डिझाइन केली होती. या कॅडिलॅक लिमोजिन कारला अमेरिकन ड्रीम नावानेही ओळखलं जातं.

या कॅडिलॅक लिमोजिन कारची खासियत वाचून तुम्ही हैराण व्हाल. आतापर्यंत तुम्ही कोणत्याही लक्झरी कारमध्ये डीजे साउंड म्युझिक सिस्टीम, मिनी बार आणि मिनी कसीनो इत्यादीबाबत ऐकलं असेल. पण या कारमध्ये यापेक्षाही जास्त सुविधा आहेत. अमेरिकन ड्रीम नावाने प्रसिद्ध या कारमध्ये स्वीमिंग पूलपासून ते हेलिपॅडपर्यंत सगळं काही आहे. ही कार खरंच एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे.

अमेरिकन ड्रीम कारची लांबी १०० मीटर होती. ही कार २६ व्हीलच्या मदतीने चालते. या कारमध्ये ड्रायव्हिंगसाठी दोन कॅबिन होते. त्यामुळे ही कार मागून आणि पुढून दोन्हीकडून चालवता येते. या कारमध्ये मिनी बार, मिमी कसीनो, मिनी किचन, बाथरूम, बेडरूम स्वीमिंग पूल आणि हेलिपॅड आहे.

त्यासोबतच या कारमध्ये सनबाथ घेण्यासाठी 'सन डेक'ही आहे. ही कार बघून हैराण होतात. कारण अशा कारची कुणी कल्पनाही केलेली नसते. ही कार इतकी लांब आहे की, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना लोक थकतात.

अमेरिकन ड्रीम कार एक चालतं-फिरतं आलिशान घरच होतं. ज्यात ऐशोआरामाच्या सर्व वस्तू आणि सुविधा होत्या. पण गाडीची देखरेख योग्य होऊ न शकल्याने कार जरा खराब झाली आहे. ही कार सध्या न्यूर्जीच्या एका गोदाममध्ये पडून आहे. कारचं बरंच नुकसान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ऐतिहासिक कारला नवा लूक देण्याबाबत विचार सुरू आहे.

जे.ओहरबर्गने कार खासकरून सिनेमे आणि प्रदर्शनासाठी डिझाइन केली होती. हॉलिवूडच्या अनेक सिनेमात या कारचा वापर करण्यात आला आहे. अनेक हॉलिवूड स्टार्सने या कारमध्ये प्रवास केला. ही कार डिझाइन करणाऱ्या जे.ओहरबर्ग यांच्याकडे कॅलिफोर्नियात लक्झरी कार आणि त्यांच्या रेप्लिकाचं एक विशाल संग्रह आहे. ओबरबर्गची कंपनी सिनेमे आणि टीव्ही शोसाठी कार्स भाड्याने देतात.

अमेरिकन ड्रीम ही कार आधी भाड्याच्या टॅक्सीच्या रूपात चालवली जात होती. त्यावेळी याचं भाडं ५० ते २०० यूएस डॉलर प्रति तास होतं. या कारमध्ये प्रवास करण्याची सधी अनेकांना मिळाली. आजही अमेरिकेतील लोकांच्या मनात या कारच्या आठवणी आहेत.