around the world: 90 वर्षे जुनी गाडी घेऊन वर्ल्ड टूरवर निघाले दाम्पत्य, 22 वर्षात केला पाच खंडांचा प्रवास... By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:40 PM 2022-03-15T18:40:27+5:30 2022-03-15T18:45:22+5:30
around the world: अर्जेंटिनातील एका जोडप्याने 2000 साली प्रवासाची सुरुवात केली. 22 वर्षांत त्यांनी 362,000 किलोमीटरचा प्रवास केला. या इतक्या वर्षांच्या प्रवासादरम्यान त्यांना 4 मुलेही झाली. 'अराउंड द वर्ल्ड इन 8 डॉलर्स' या चित्रपटात राज कपूर 8 डॉलर खिशात घेऊन जगभर फिरतात. चित्रपटातला हा पराक्रम एवढा रोमांचित करतो, तेव्हा कल्पना करा की असंच काही कुणीतरी खऱ्या आयुष्यात केलं तर किती थरारक अनुभव असेल. एका जोडप्याने अशाच प्रकारची एक अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 10 वर्षे नाही, तर तब्बल 22 वर्षे प्रवास केला आहे.
प्रवासादरम्यान मुलेही झाली... अर्जेंटिनातील एका जोडप्याने 1928 मध्ये बनवलेल्या एका जुन्या कारमध्ये जगातील 5 खंडांचा प्रवास पूर्ण केला. 2000 साली सुरू झालेला हा प्रवास यावर्षी तब्बल 22 वर्षांनी संपला. प्रवासावर निघताना ते फक्त दोघेच होते, पण प्रवासादरम्यान त्यांना मुले झाली आणि त्यांनी आपल्या मुलांसोबत हा प्रवास पूर्ण केला. झॅप कुटुंबातील हर्मन आणि कँडेलेरिया यांनी त्यांच्या मुलांसह या 22 वर्षांत एकूण 362,000 किमी अंतर कापले.
बोटीने जगाच्या प्रवासावर जाण्याची योजना... सन 2000 मध्ये त्यांनी ब्युनोस आयर्स येथून प्रवासाला सुरुवात केली होती आणि हा प्रवास उरुग्वेच्या सीमेला लागून असलेल्या त्यांच्या गावात पूर्ण झाला. हा प्रवास संपल्यानंतर ते दोघे दु:खी आणि आनंदी असल्याचे हर्मन सांगतो. आता पुढे काय करावे हे सतत त्यांच्या मनात येत आहे. 53 वर्षीय हर्मन आता बोटीने जगाचा प्रवास करण्याचा विचार करत आहे. तर, कँडेलरिया म्हणाली की, प्रवासातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिला वाटेत भेटणारे लोक.
90 वर्षे जुन्या गाडीने सुरू केला प्रवास... या जोडप्याच्या लग्नाला 6 वर्षे झाली होती. चांगली नोकरी होती, छान घर होते, मग एके दिवशी सर्व काही बदलले. त्यांनी सामान बांधून अलास्काच्या सहलीला जायचे ठरवले आणि इथूनच त्यांची जगाला प्रदक्षिणा घालण्याची प्रक्रिया सुरू झाली. या सहलीसाठी कोणीतरी त्यांना 1928 साली बनवलेली ग्रॅहम-पेज अमेरिकन कार दिली. त्याचे इंजिन खराब झालेले होते आणि कारला चांगला पेंटही नव्हता. याशिवाय, गाडीत एसी किंवा नीट आरामदायी खुर्च्याही नव्हत्या. पण या कारने त्या दोघांना 22 वर्षे साथ दिली.
वाटेतच मुलांचा जन्म झाला... 22 वर्षांच्या या प्रवासात त्या जुन्या गाडीची 8 वेळा चाके बदलण्यात आली तर इंजिनचे दोनदा काम केले. त्यांच्या 4 मुलांचाही जन्म रस्त्यातच झाला, त्यापैकी पम्पा आता 19 आणि तेह्यू 16 वर्षांचा आहे. पालोमा झाली तेव्हा हर्मनने कार कट करुन त्यात जागा वाढवली. 14 वर्षीय पालोमाचा जन्म कॅनडामध्ये झाला, तर 12 वर्षीय वालाबीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. एवढेच नाही तर या प्रवासात त्यांच्या कुटुंबात आणखी दोन सदस्य होते ज्यांनी त्यांना साथ दिली. यात टिमोन नावाचा कुत्रा आणि हकुना नावाची मांजर आहे.
इंजिनवर करायचे स्वयंपाक... हे लोक स्वयंपाक करण्यासाठी आणि पाणी गरम करण्यासाठी इंजिनची उष्णता वापरायचे. अशाप्रकारे 22 वर्षे ही कार त्यांचे घरचं होती. या घराची खास गोष्ट म्हणजे हे घर कधी डोंगरासमोर तर कधी समुद्राजवळ असायचे. या गाडीच्या एका बाजूला जग पाहायला निघालेले कुटुंब, असे लिहीलेले होते. झॅप कुटुंब विविध देशात लोकांच्या घरी पाहुणे म्हणून राहायचे. हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. प्रवासात हरमनला मलेरिया झाला. कुटुंब आशिया ओलांडत असताना बर्ड फ्लूचा उद्रेक झाला. आफ्रिकेतील इबोला आणि मध्य अमेरिकेत डेंग्यू झाला. झॅप कुटुंबाने त्यांच्या या प्रवासावर एक पुस्तकही लिहीले आहे, ज्याच्या आतापर्यंत 1 लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.
5 खंडांचा प्रवास... आपल्या प्रवासात त्यांनी अमेरिका, आफ्रिका, ओशनिया, आशिया आणि युरोप असा प्रवास करत एव्हरेस्ट गाठले. प्रवासात त्यांनी बदकाची अंडी खाली, नामिबियातील लोकांसोबत नृत्य केले. इजिप्तमधील राजा तुतच्या पिरॅमिडवर गेले. त्यांच्या मुलांसाठी हा कधीही न विसरणारा अनुभव आहे.