'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 01:19 PM 2021-10-25T13:19:33+5:30 2021-10-25T13:22:59+5:30
इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये 'अटलांटिक ब्लूफिन टूना' हा जगातील सर्वात महागडा मासा दिसून आला आहे. जगात असे अनेक प्राणी आहेत जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या कारणास्तव या प्राण्यांची शिकार करणे गुन्हा मानला जातो. हे प्राणी इतके महाग आहेत की त्यांच्या किंमतीचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका माशाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात महागडा मासा आहे. काही दिवसांपूर्वीच हा मासा इंग्लंडमध्ये आढळून आला आहे.
इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये जगातील सर्वात महाग आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला 'अटलांटिक ब्लूफिन टूना'(Atlantic Bluefin Tuna) मासा दिसला आहे. हा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या कारणास्तव ब्रिटनमध्ये त्याची शिकार करण्यावर बंदी आहे. शिकार करताना पकडल्यावर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
एखाद्या मच्छीमाराच्या जाळ्यात हा मासा आला, तर त्याला तोड समुद्रात सोडून द्यावा लागतो. 23 ऑक्टोबर रोजी पीटर नीसन नावाच्या व्यक्तीला इंग्लंडमध्ये अनेक ब्लूफिन टूना मासे दिसले. हा मासा पाहून त्यांनाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास झाला नाही. हा मासा दिसताच त्यांनी त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले. दरम्यान, कॉर्नवॉलमध्ये ब्लूफिन टूना मासे दिसण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षी ऑगस्ट महिन्यातही हा मासा दिसला होता.
ब्लूफिन टूना हा माशांच्या टूना प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे. हा मासा खूप वेगाने पोहू शकतो या माशाचा आकार पाणबुडीतून निघणाऱ्या टॉर्पेडो शस्त्रासारखा आहे. या आकारामुळे, तो समुद्रात खूप जास्त वेगाने लांब अंतर कापू शकतो. तज्ञांच्या मते, हा मासा 3 मीटर लांब आणि त्याचे वजन 250 किलो पर्यंत असू शकते.
टूना फिश मानवांसाठी धोकादायक नाही, त्यांच्या आहारात इतर लहान मासे असतात. हे मासे उबदार रक्ताचे असतात आणि शरीरात निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे यांची पोहण्याची स्पीज खूप जास्त असते. 2020 मध्ये टोकियोमध्ये एका ब्लूफिन टूना माशाचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळेस त्या माशाला 12.8 कोटी रुपयांची बोली लागली होती.